फेब्रुवारीपासून मुंबई विमानतळावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी ताटकळत थांबावे लागणार आहे. मुंबई विमातळावरील मुख्य रन वे डागडूजीच्या कामासाठी दररोज आठ तास बंद ठेवले जाणार असून याचा फटका विमानतळावरील वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळावरील मुख्य रन वेच्या डागडूजीचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या कामासाठी दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुख्य रन वे वरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. तब्बल तीन महिन्यांसाठी हे काम चालणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुख्य रन वेवची डागडूजी करण्यात आली होती. सुमारे ४० दिवस मुख्य रन वे काही काळासाठी बंद ठेवावे लागले होते.

मुंबई विमानतळाच्या मुख्य रन वेवरुन दररोज सुमारे ८०० विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होते. मुख्य रन वे बंद असेल त्या कालावधीत विमानतळावरील पर्यायी छोट्या रन वेचा वापर केला जाणार आहे. पर्यायी रन वे उपलब्ध असला तरी मुख्य रन वे ऐवढी त्याची क्षमता नाही. त्यामुळे विमानाच्या उड्डाणात विलंब होणारच असे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिका-यांनी ‘हिंदूस्तान टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. याशिवाय जम्बो विमानाच्या वेळेतही बदल केला जाईल. हे विमान पर्यायी रन वेचा वापर करु शकत नाही याकडेही अधिका-यांनी लक्ष वेधले आहे.

डागडूजीच्या काळात मुंबई विमानतळावरील ७० ते ८० विमानांचे उड्डाण रद्द होण्याची शक्यता आहे. याचा फटका दररोज सुमारे १५ हजार प्रवाशांना बसू शकते असे समजते. दरम्यान हे काम तीन महिने चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत विमान कंपन्यांनाही आर्थिक नुकसान सोसावा लागेल असे दिसते. मार्चनंतर पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या जास्त असते. अशा प्रवाशांनाही याचा फटका बसू शकेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.