छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांसाठी दररोज सहा तास बंद असणार आहे. विमान सेवा वापरणाऱ्यांना 30 मार्चपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. केवळ 21 मार्च रोजी विमानांचे उड्डाण सामान्यपणे होतील. दुरूस्तीच्या कामामुळे अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. परिणामी मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या अथवा मुंबईला येणाऱ्या विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत. मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद अशा अनेक व्यस्त मार्गांवरील तिकीट दरांमध्ये तब्बल 20 ते 50 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई विमानतळावर प्रत्येक 65 सेकंदाला एक विमान ये-जा करत असते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण पडत आहे. साहजिकच धावपट्टीची वेळच्यावेळी दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुख्य धावपट्टी बंद राहणार आहे. मुख्य धावपट्टी बंद असली तरीही दुसऱ्या धावपट्टीवरून विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग होऊ शकणार आहे. पण याचा परिणाम निश्चितच विमानसेवेवर होणार आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे होणारा परिणाम आणि लागणारा वेळ लक्षात घेऊन विमान सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी नवे वेळापत्रक लक्षात घ्यावे असे आवाहन जेट एअरवेजने केले आहे. तसंच तिकीटांसाठी खिशावर पडणारा बोजा कमी करण्यासाठी प्रवाशांनी ऐनवेळी तिकीट बुक करण्याऐवजी आधीच आपल्या प्रवासाची योजना आखावी आणि त्याप्रमाणे तिकीट काढावेत असं आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आलं आहे.