28 February 2021

News Flash

मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून उतरलं; अनेक विमानांचे मार्ग वळवले

स्पाइसजेटचे एसजी ६२३७ हे विमान सोमवारी मध्यरात्री धावपट्टीवरून उतरल्याची घटना घडली.

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  तसेच या पावसाचा परिणाम रेल्वेसोबतच विमान सेवांवरही झाला आहे. अशातच सोमवारी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सोमवारी मध्यरात्री जयपुरवरून मुंबईला येणारे विमान लँड करताना धावपट्टीवरून उतरल्याची घटना घडली. दरम्यान, यामध्ये कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तसेच यानंतर अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

जयपुरवरून मुंबईला येणारे स्पाइसजेटचे एसजी ६२३७ हे विमान सोमवारी मध्यरात्री धावपट्टीवरून उतरल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे विमान लँड करताना ही घटना घडली.  दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यानंतर इंडिगोच्या ६ इ ५२३१ या विमानाचा मार्ग बदलून ते विमान अहमदाबादला वळवण्यात आले. हे विमान कोयंबतूरवरून मुंबईला येत होते.  दरम्यान, पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचा मार्ग बदलण्यात आला.

तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे सेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. तर हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध स्टेशनवर केल्या जात आहेत. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेला पावसाने ब्रेक लावला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरही अशीच काहीशी स्थिती आहे. नालासोपारा आणि वसई या भागात प्रचंड पाऊस पडतो आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्येही पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही झाला आहे. इतकंच नाही तर हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली. त्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे प्रचंड पाऊस झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे.

दरम्यान, सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तसेच रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेता आरपीएफ आणि होमगार्डनाही रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आले होते. पालघरनजीक रेल्वे रूळांखालील माती माती वाहून जात असल्याचीही घटना समोर आली होती. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 7:38 am

Web Title: mumbai airport runway spicejet flight overshoots heavy rain jud 87
Next Stories
1 मालाड भिंत दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
2 मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जण ठार, १३ जखमी
3 अतीवृष्टीमुळे मुंबईचा चक्का जाम; सरकारने जाहीर केली सुट्टी
Just Now!
X