मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी रोज सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ३० मार्चपर्यंत या धावपट्टीचे काम टप्प्याटप्यात होईल.

मुंबई विमानतळावर सध्या दोन धावपट्टया आहेत. या दोन्ही धावपट्टयांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे त्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवली जाईल. यादरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्दच राहतील. तर काही सेवा अन्य मार्गे वळवण्यात येतील.  या कामामुळे प्रत्येक दिवशी २३० विमान सेवा रद्दच करण्यात आल्या आहेत. धावपट्टी बंद होण्याआधी आणि सांयकाळी पाचनंतरही विमानसेवा उशिरानेच धावतील. २१ मार्च रोजी मात्र हे विमानतळ पूर्ण दिवस सुरू राहील. मुंबई विमानतळ हे देशातील व्यस्त असे विमानतळ आहे. या विमानतळावरून दररोज ९५० विमानासेवा सुरू असतात. येथे दोन धावपट्टया असून त्या एकमेकांना छेदतात. त्यामुळे एकाच धावपट्टीचा उड्डाणासाठी किंवा लॅंडींगसाठी वापर केला जातो. ३० मार्चपर्यंत चालणाऱ्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.