व्यवहारांना गती : उद्यापासून सर्व दुकाने खुली; थेट मद्यविक्रीसही परवानगी

मुंबईतील अनेक भागांत करोना नियंत्रणात येत असल्याने ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सातही दिवस खुली ठेवण्यास मुंबई पालिकेने परवानगी दिली. मद्य दुकानांनाही ग्राहकांना थेट विक्रीची मुभा देण्यात आली असून, मॉल आणि बाजार संकुलातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यवहारांना गती मिळणार असून, मुंबई हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईत करोना रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात येताना दिसत आहे. अनेक भागांत रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील सर्वच दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी परवानगी दिली. मॉल आणि बाजारसंकुलातील दुकानेही सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मॉलमधील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थाच्या स्टॉलमधून घरपोच सेवा सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र, मुंबईकरांना घरापासून दूर असलेल्या बाजारात वा दुकानांमध्ये खरेदीसाठी जाता येणार नाही, असे पालिका आयुक्तांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी मद्यदुकानांना घरपोच मद्यविक्रीची मुभा होती. आता ग्राहकांना थेट मद्यविक्री करण्यास दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच केशकर्तनालये, ब्युटिपार्लर आदी अटीसापेक्ष सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, बॅडमिंटन आदींनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जलतरण तलाव सुरू करण्यास अद्यापही परवानगी नाही.

मुंबईत टॅक्सीमधून चालकासह चौघांना, रिक्षामधून चालकासह तिघांना, चारचाकी वाहनातून चालकासह चौघांना आणि दुचाकीवरून दोघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अंतराच्या नियमांचे पालन आणि प्रत्येकाला मुखपट्टीचा वापर करावाच लागणार आहे. मुखपट्टी न वापरता वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

व्यापाऱ्यांकडून स्वागत

मुंबईत सुमारे तीन लाख दुकाने असून, दुतर्फा दुकाने दररोज सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. ती मान्य झाल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे (एफआरटीडब्ल्यूए)अध्यक्ष विरेश शाह यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुंबईप्रमाणेच राज्यातील सर्व ठिकाणी दुकाने सातही दिवस खुली ठेवण्यास परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे, पालघर जिल्ह्य़ात मात्र निर्बंध कायम

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील पालिका प्रशासनांनी मात्र सम-विषम पद्धतीनेच दुकाने सुरु ठेवण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबईचा अपवाद वगळता ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर पालिका तसेच अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात मॉल आणि मोठी व्यापारी संकुले ३१ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्य़ात मद्यदुकानातून थेट विक्री करण्यास अद्यापही मनाई आहे.