शाळकरी मुलीशी अश्लील वर्तणूक करून तिचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीस डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिजेश यादव असे या आरोपीचे नाव आहे.
 पीडित मुलगी अंधेरीच्या एका शाळेत शिकत होती. शाळेच्या बाहेर या मुलीला गाठून तो तिच्याशी अशील कृत्य करत होता. या प्रकरणाचे भेदरलेली मुलगी गेल्या दोन दिवसांपासून शाळेत गेली नव्हती. मात्र नंतर तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी यादवला शाळेबाहेरच पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला १९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

खांदेश्वर तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पनवेल: खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील तलावात बुडून कुल्र्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दोघे जण पोहण्यासाठी तलावात उतरले होते. शाळेत न जाता परस्पर खांदेश्वरला सहलीसाठी ते आले होते. नदीम किसाउल चौधरी आणि उस्मान तबारक अलिशद अशी मृतांची नावे आहेत. दोघेही नववी इयत्तेत शिकत होते. कुर्ला येथील कार्तिक विद्यालय आणि अंजुमन इस्लाम विद्यालयातील नववीतील दहा विद्यार्थ्यांचा गट शाळा बुडवून खांदेश्वर येथे सहलीस आला होता. स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या तलावात नदीम आणि उस्मान हे दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई : दादर येथे देवदर्शनासाठी मंगळवारी पहाटे निघालेल्या दहिसर येथील विकास साहनी (१६) या तरुणाचा बोरिवली दरम्यान रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला.दादर येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी विकासने दहिसर रेल्वे स्थानकातून पहाटे ५.४४ वाजताची लोकल पकडली. काही अंतरावर विकासला एका खांबाची धडक बसली आणि तो रेल्वेतून बाहेर फेकला गेला. रेल्वे पोलिसांनी तातडीने विकासला बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी संजय शर्मा (२४) हा चारकोपच्या श्रावणनगर येथील एका कारखान्यात काम करत होता. तेथीलच एका अल्पवयीन मुलीशी त्याने मैत्री केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता.

बेस्टच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मुंबई: बेस्ट बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. नरिमन पॉइंट येथील मादाम कामा रोडवर सोमवारी रात्री हा अपघात घडला.    गंभीर जखमी असलेल्या प्रदीप पाटील (२६) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुशांत पाटील (२६), जोतिबा पाटील (२८) आणि किरण पाटील या तिघांवर पुढील उपचार सैफी रुग्णालयात सुरू आहेत.