मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवार संध्याकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. काल रात्रभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात एक सुखद, आल्हादायक गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत आता अनलॉक तीनचा फेज सुरु आहे. दुकाने, कार्यालये सुरु असल्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ असते तसेच वाहनांची संख्यादेखील वाढली आहे.

काल पावासामुळे रस्त्यावरील वाहतुकीची गती मंदावली होती. पण एक-दोन तासाच्या मुसळधार पावासानंतर वाहतूक ठप्प होऊन जाते, तशी स्थिती नव्हती. दरवर्षीप्रमाणे यंदाही काही तास जोरदार पाऊस कोसळल्यानंतर सखल भागात पाणी साचत आहे. उदहारणार्थ हिंदमाता परिसर. नेहमीप्रमाणे .यंदाच्यावर्षी सुद्धा येथे अनेकवेळा पाणी साचले आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा (रेड अर्लट) देण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई आणि परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस
हवामान विभागाने मुंबई आणि परिसरास सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात केवळ हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानेच हजेरी लावली. दिवसभरात केवळ काही सरींपुरताच पाऊस मर्यादीत होता. सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी आल्या. या भागात सुमारे २० ते ४० मिमी पाऊस झाला. तर भायखळा आणि परिसरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरे, मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात १० ते २० मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरीत ठिकाणी हलका (५ ते १० मिमी) पाऊस नोंदविण्यात आला.