पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून एकाला ताब्यात घेतले आहे. वैभव राऊत असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या घरातून आणि दुकानात काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त  इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांच्या पथकाला तिथे संशयास्पद साहित्य सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. यात बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी वैभव राऊतलाही ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अटक केल्यानंतर त्याला भोईवाडा न्यायालयात हजर केले जाईल, असे समजते.

या कारवाईबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  वैभव राऊतचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त असले तरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

सनातनच्या वकिलांची प्रतीक्रिया

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातचना साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. यासोबतच वैभव राऊत याने असं काही केलं असावं असं मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत करु असं सांगताना पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जातो तसंच मुख्यमंत्री वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत असंही ते म्हणाले आहे.