मुंबईच्या जिया राय या १२ वर्षीय मुलीने बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी वांद्रे-वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले. जियाला ऑटीस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) हा रोग झाला असूनसुध्दा ती समुद्रात आठ तास ४० मिनिटे पोहत होती. यामुळे नेटिझन्सने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

एएसडी हा रोग झालेला असूनसुध्दा समुद्रात ३६ किलोमीटर पोहणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती हा विक्रम तिने प्रस्थापित केला आहे. “या हिंमतवान मुलीने हा संदेश अगदी स्पष्टपणे दिला आहे की तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होण्यापासून काहीही रोखू शकत नाही”, असे ट्विट मुंबई डिफेन्स पीआरओने केले आहे.

१७ फेब्रुवारीच्या पहाटे तिने वांद्रे-वरळी सी लिंकपासून ३ वाजून ५० मिनीटांनी पोहण्यास प्रारंभ केला आणि १२.३० वाजता ती गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचली. हा कार्यक्रम भारतीय जलतरण महासंघाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या निरीक्षणाखाली घेण्यात आला. हा कार्यक्रम युवा व क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया या उपक्रमाशी पण संबंधित असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

जियाला तिच्या या कामगिरीबद्दल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन भारतीय जलतरण महासंघाचे सहयोगी उपाध्यक्ष अभय दधे यांनी गौरविले आहे. तिचे वडील मदन राय नौदल नाविक आहेत. तिच्या थेरपीचा भाग म्हणून जियाने १९ वर्षांची असल्यापासून पोहायला सुरुवात केली. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने समुद्रात पोहण्याचा निर्णय घेतला.