मुंबई शहरात माणसांच्या गर्दीप्रमाणे वाहनांचीही गर्दी झाली आहे. त्यामुळे सातत्याने हॉर्न वाजवण्यामुळे मुंबईच्या ध्वनी प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘आवाज फाऊंडेशन’ या एनजीओच्या पुढाकाराने राज्य परिवहन विभाग, रिक्षा संघटना आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या एक आगळावेगळी मोहिम राबवली आहे. शांततेसाठी राखण्यात येणाऱ्या ‘मौनव्रत’च्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्नव्रत’ नावाची ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांनी हॉर्न वाजवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील एक प्रातिनिधिक रिक्षाला अनेक हॉर्न, भोंगे लावून सजवण्यात आले असून याद्वारे नागरिकांचे या मोहिमेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

आवाज फाऊंडेशनने २७ जानेवारीपासून मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून या रिक्षाला हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर ही रिक्षा शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन नागरिकांमध्ये हॉर्न न वाजण्याबाबत जनजागृती करीत आहे.

आवाज फाऊंडेशनने केलेल्या दाव्यानुसार, मुंबईत १८ दशलक्ष प्रती तास या प्रमाणात वाहनांचे हॉर्न वाजवले जातात. या एनजीओने शहरातील सर्वसामान्य वाहन असलेल्या रिक्षाची यासाठी प्रातिनिधीक वाहन म्हणून निवड केली आहे. त्यानंतर आता या मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारो रिक्षा ड्रायव्हर एनजीओकडे विचारणा करीत असल्याचे आवाज फाऊंडेशनने सांगितले आहे.

या मोहिमेचा परिणाम म्हणजे आता रिक्षा संघटनांचे सदस्यही हॉर्न वाजवण्याचे दुष्परिणाम सांगत आहेत. हॉर्न वाजवल्याने होणाऱ्या ध्वनिप्रदुषणामुळे तणाव आणि चिडचिड वाढते. त्याचे माणसाच्या प्रकृतीवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.