मंजूर रस्ता रेषेवरील वाहनतळ हटवून दुहेरी वाहतुकीला मार्ग

तब्बल ५१ वर्षांपूर्वी रस्ता रेषा म्हणून मंजूर झाल्यानंतरही वाहनतळामुळे अवघडलेली दक्षिण मुंबईमधील मेट्रो चित्रपटगृहाजवळची बॉम्बे हॉस्पिटल लेन लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. पालिकेने वाहनतळ हटवून रस्ता विस्तारीकरण केल्याने बॉम्बे हॉस्पिटल लेनमधून आता दुहेरी वाहतूक सुरू होण्यातील अडसर दूर झाला असून त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांचा द्राविडी प्राणायाम टळणार आहे.

दक्षिण मुंबईमधील धोबीतलाव परिसरातील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मोठय़ा संख्येने रुग्ण येत असतात. प्रकृत्य अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका अधूनमधून रुग्णालयात येतच असतात. त्यातच चित्रपटगृह, खासगी कार्यालय, प्रार्थनास्थळ, औषधांची दुकाने आदींमुळे रुग्णालयाच्या आसपासचे रस्ते कायम गर्दीमध्ये हरवलेले असतात. रुग्णालय परिसरातील चिंचोळ्या रस्त्यांमुळे तेथे वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग करण्यात आला आहे. या एकदिशा मार्गामुळे अनेक वेळा रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना रुग्णालयात घेऊन येण्यासाठी महर्षी कर्वे मार्गावरून आयकर भवनाकडून (आताचे वस्तू आणि सेवा कर भवन) द्राविडी प्राणायाम घडत होता. महर्षी कर्वे मार्गावरील वाहतूक लक्षात घेता रुग्णवाहिकेला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत होता.

धोबीतलाव येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके चौकाजवळच्या महात्मा गांधी रोडवरून बॉम्बे हॉस्पिटल लेनमधून अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णालयात पोहोचणे रुग्णवाहिकेस शक्य आहे. मात्र हा रस्ता एकदिशा मार्ग असल्याने तेथून रुग्णवाहिका अथवा खासगी वाहनातून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणे शक्य होत नव्हते. बॉम्बे हॉस्पिटल लेनमधून रुग्णालयात जाणे शक्य व्हावे म्हणून १९६७ साली या मार्गावर रस्ता रेषेला मंजुरी देण्यात आली होती. रस्ता रेषा मंजूर झाल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटल लेनचे रुंदीकरण करणे पालिकेला सहज शक्य होते. मात्र गेली २०-२५ वर्षे बॉम्बे हॉस्पिटल लेनवरील मंजूर रस्ता रेषेची जागा वार्षिक केवळ ५०० रुपये भाडेपट्टय़ाने रुग्णालयाला वाहनतळासाठी वापरण्यास दिली होती. तसेच त्या वेळी या लेनमधून महात्मा गांधी मार्गावर जाण्यासाठी एकदिशा मार्ग म्हणून मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे महात्मा गांधी मार्गावरून रुग्णवाहिकेला या लेनमधून थेट रुग्णालयात जाता येत नव्हते.

गेली ५१ वर्षे पालिकेने रस्ता रेषेच्या जागेत उभ्या असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलच्या वाहनतळाच्या पसाऱ्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी गेली पाच वर्षे सातत्याने या मार्गाच्या रुंदीकरणासाठी पाठपुरावा केला होता. अखेर वाढलेली वाहतूक, रुग्णांना घेऊन येणाऱ्या खासगी वाहन आणि रुग्णावहिकांचा होणारा खोळंबा आदी बाबी लक्षात घेऊन पालिकेने १९६७ मध्ये मंजूर झालेल्या रस्ता रेषेचा आधार घेत बॉम्बे हॉस्पिटल लेनचे रुंदीकरण सुरू केले आहे. पालिकेने रुग्णालयाचे वाहनतळ, पदपथावर उभे असलेले तीन-चार स्टॉल्स आणि एक प्याऊ हटविले असून लवकरच या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

रुग्णाला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला धोबीतलाव चौकाजवळून थेट चर्चगेटपर्यंत पुढे जाऊन रुग्णवाहिकेला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये यावे लागत होते. परंतु आता धोबीतलाव चौकातून महात्मा गांधी मार्गावरून रुग्णवाहिकेला थेट बॉम्बे हॉस्पिटल लेनमधून रुग्णालयात पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.    – किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय