23 November 2019

News Flash

‘एकवीस’ नाही! वीस एक, ‘त्र्याण्णव’ नाही नव्वद तीन; गणिताचे अजब पुस्तक!

दुसरीच्या पुस्तकात अचानक झालेल्या बदलांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक चकीत झाले आहेत

बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अजबच बदल करण्यात आले आहेत. यामुळे गणितातील संख्या वाचन सोपे झाले की कठीण हा प्रश्नच आहे. कारण विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवणारे बदल गणिताच्या पुस्तकात करण्यात आले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हे बदल करण्यात आले आहेत. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते म्हणून हा बदल करण्यात आल्याचा दावा शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी केला आहे.

गणिताच्या मराठी वाचनात यापुढे संख्या वाचन करताना २१ चा उच्चार एकवीस असा नाही तर वीस एक असा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बावीसचा उच्चार वीस तीन, तेवीसचा उच्चार वीस तीन, चोवीसचा उच्चार वीस चार अशा रितीने हे उच्चार करण्यात आले आहेत. एकतीसचा उच्चार तीस एक, बत्तीसचा उच्चार तीस दोन अशा रितीने बदल करण्यात आले आहेत. संख्यावाचन करताना यापुढे विद्यार्थी  ६१ या संख्येला एकसष्ट न म्हणता साठ एक म्हणतील, ६२ या संख्येला बासष्ट न म्हणता साठ दोन म्हणतील इतरही उच्चार अशाच प्रकारचे असतील. ७१ चा उच्चार एकाहात्तर असा न करता सत्तर एक, ७२ चा उच्चार बहात्तर असा न करता सत्तर दोन असा करण्यात येईल. ९३ त्र्याण्णव असा उच्चार न करता नव्वद तीन असा उच्चार केला जाईल. १ ते १०० या ठिकाणी जिथे जोडाक्षर येते तिथे ती संख्या नव्या पद्धतीने वाचण्याची सूचना अभ्यास मंडळाने दिली आहे.

मराठी जोडाक्षरं कठीण आहेत त्यामुळे त्यांचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते हे कारण देऊन हे बदल करण्यात आले आहेत. दुसरीच्या अभ्यासक्रमातले हे अजब बदल पाहून शिक्षकही चकीत झाले आहेत. अनेक शहरांमध्ये सुट्टीनंतर सोमवारी म्हणजेच १७ जून रोजीच शाळा उघडल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी हा बदल विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या समोर आला आहे. संख्यांचा उच्चार कसा करावा याची जुनी आणि नवी पद्धत मांडण्यात आली आहे. मात्र शिक्षकांनी नव्या पद्धतीनेच शिकवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान संख्यावाचनात जे बदल सुचवले गेले आहेत त्याची काहीही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. जे बदल केले आहेत ते शिकवताना आणि मुलांना उच्चारतानाही कठीण जाणार आहे. शुद्धलेखनाच्या बाबतीत जसे काही घोळ आढळतात तसेच संख्या कशी उच्चारली जावी याबाबही काही संभ्रम आहेत असंही पानसे यांनी म्हटलं आहे. तर जुन्या पद्धतीने जे शिकले आहेत त्यांना आम्ही त्यांचे उच्चार बदला असे सांगत नाही पण जसं पंचावन्न म्हणणं योग्य ठरेल तसंच पन्नास पाच म्हणणंही योग्य ठरेल असं मत मंगला नारळीकर यांनी मांडलं आहे.

 

First Published on June 18, 2019 9:12 am

Web Title: mumbai balbharti made changes in maths marathi medium second standard book scj 81
Just Now!
X