जोगेश्वरी उड्डाणपुलाजवळ तासभर वाहतूक कोंडी ; पश्चिम उपनगरांत फारसा परिणाम नाही

मुंबई : राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंददरम्यान पश्चिम उपनगरांत सर्व व्यवहार सुरळीत होते. आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती मार्गावर रास्ता रोको केल्याने काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर जोगेश्वरी स्थानकात दहा मिनिटे रेल्वे रोको करण्यात आला. मात्र या बंदचा पश्चिम उपनगरवासीयांना फारसा फटका बसला नाही.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली समता नगर, मागाठाणे, मालाड पूर्वेकडील राणी सती मार्गावर, जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको करत आंदोलन केले. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दक्षिणेकडे जोगेश्वरी उड्डाणपुलाच्या टोकाला तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याशिवाय जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटला जाणारी ९ वाजून १६ मिनिटांची जलद लोकल आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली. दहा मिनिटे लोकल अडवून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रेल रोकोची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना रुळावरून बाजूला केले. सुमारे दहा मिनिटांनंतर लोकल सेवा पूर्ववत झाली. कांदिवली पूर्व, चारकोप व मालाड पूर्व परिसरात बुधवारी सकाळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून बेस्ट बस रोखल्या. दिंडोशी परिसरात दुपारी अज्ञात व्यक्तीने बेस्ट बसवर दगड मारून पळ काढला. दहिसर एस. व्ही. रोडवरही आंदोलनकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.

बोरिवली रिक्षा चालक-मालक संघानेदेखील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविल्यामुळे काही ठिकाणी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. गोराई परिसरातही आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोराई परिसर दणाणून सोडला. गोराई, दहिसर येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दुकाने बळजबरीने बंद करायला लावल्याचे दिसून आले.

शाळा, महाविद्यालयांमधील उपस्थिती कमी

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जाहीर करण्यात आलेल्या मुंबई बंदच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली नसली तरी अनेक शाळा लवकर सोडण्यात आल्या. शाळा-महाविद्यालयांमधील उपस्थितीही काहीशी रोडावली होती.

मुंबई आणि परिसरातील शाळांवरही बंदचा परिणाम दिसून आला. स्थानिक परिस्थिती पाहून शाळांच्या वेळा किंवा सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे शाळा भरल्या, मात्र शाळांमधील उपस्थिती नेहमीपेक्षा कमी होती. दुपारी बंदचा परिणाम अधिक तीव्रतेने दिसू लागला. बहुतेक ठिकाणी बस, टॅक्सी बंद झाल्या तर उपनगरांमध्ये सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केल्यामुळे शाळेच्या बसेसही वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर सोडण्याचा निर्णय खासगी शाळांनी घेतला. ठाणे, नवी मुंबई या भागांत सकाळपासूनच आंदोलनकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर शहर आणि उपनगरांतील दुपारच्या सत्रातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर अनेक शाळांनी दुपारच्या सत्रातील वर्ग लवकर सोडले.

विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे शाळा सुटताना ती वेळेवर पोहोचू शकली नाहीत. मुलांना घेऊन जाण्याचे संदेश शाळांनी पालकांना पाठवले. शाळा बंद ठेवण्याच्या किंवा लवकर सोडण्याच्या शाळा व्यवस्थापनांच्या आयत्यावेळी जाहीर करण्यात आलेल्या निर्णयाने पालकांचा मात्र गोंधळ उडाला.

महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केली नसली तरी दुपारनंतरच्या अनेक तासिका रद्द करून विद्यार्थ्यांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांमध्येही नेहमीपेक्षा विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.

दहावी -बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे हाल

राज्य मंडळाची दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा सध्या सुरू आहे. बारावीची अर्थशास्त्र विषयाची परीक्षा बुधवारी सकाळी ११ वाजता, तर दहावीची सकाळच्या सत्रात गणित भाग १ आणि दुपारच्या सत्रात सामान्य गणित विषयाची परीक्षा होती. सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केल्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. ‘परीक्षेला उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र अशा फारशा तक्रारी आल्या नाहीत. चार ते पाच विद्यार्थ्यांच्याच पोहोचायला उशीर झाल्याच्या तक्रारी आल्या. परीक्षेला पोहचता आले नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सायंकाळपर्यंत आलेल्या नाहीत,’ अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे यांनी दिली.