खातेदारांच्या नावावर परस्पर कर्ज काढून पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांकडून अपहार; गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (मुंबै बँक) राज्यकर्त्यांनी आपल्या मनमानीचा कहर करीत आणखी नवा आर्थिक घोटाळा केल्याचे बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या चौकशीतून उघडकीस आले आहे. यातील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या कर्ज योजनेतून अनेक सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज प्रकरणे केली.  यासोबत पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदा कर्ज मंजूरी दिली. अन् त्याही पुढे जाऊन अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर करून कोटय़वधी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या चौकशीचा अहवालच ‘लोकसत्ता’स उपलब्ध झाला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी बँकेचे पदाधिकारीच हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काही संचालकांनी केला आहे.

Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

दोषींची पाठराखण..

पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी यांच्या माध्यमातून शकडो बनावट कर्जप्रकरणे करून कर्जदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या नावावर वळती करून कोटय़वधी रुपये कमविण्याचा गैरप्रकार बँकेत सुरू असतानाही, दोषींवर कारवाई करण्याऐवजी काही पदाधिकारी त्यांची पाठराखण करीत असल्याच्या तक्रारी वाढत असून काही सभासदांनी तर याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई बँकेवर सध्या सत्ताधारी भाजपची सत्ता असून आमदार प्रवीण दरेकर हे बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेत आणि राज्यातही सत्ता असल्याने सध्या बँकेतही सत्तेचे वारे हवे तसे वाहत असून त्याचाच फायदा त्यांचे सगेसोयरे घेत असल्याची चर्चा बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये ऐकावयास मिळत आहे.

धक्कादायक..

महत्त्वाचे म्हणजे, कर्ज खातेदारांच्या खात्यावरून पैसे काढून घेणाऱ्यांमध्ये बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मेहुण्यासह शाखाधिकाऱ्याचाही समावेश आहे. महेश पालांडे हे बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असून १२ कर्ज प्रकरणात कर्ज खातेदारांच्या खात्यातून पालांडे यांच्या अशोकवन शाखेतील खात्यावर (क्र.५१/१०/०१/४९२) तब्बल १२ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र पालांडे यांच्या खात्यातून कर्जदारांच्या खात्यावर केवळ एक लाख १२ हजार ४०० रुपये वळविण्यात आले. अन्य एका प्रकरणात कर्जदाराच्या खात्यावरून अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यात (खाते क्र. ५१/१०/०१/१०)  २.४० लाख रुपये जमा करण्यात आले तर खरात यांच्या खात्यातून केवळ अनिरुद्ध रईजादे या कर्जधारकाच्या खात्यावर केवळ १० हजार रुपये जमा करण्यात आले. याचप्रकारे राजेंद्र घोसाळे यांच्या ठाकूर व्हिलेज कांदिवली येथील खात्यावर (खाते क्र. ४९/१०/०१/१७९५) कर्ज खातेदारांच्या खात्यातून दोन लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बँकेच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले ठाकूर व्हिलेज कांदिवली शाखेचे व्यवस्थापक सी. ए. खानविलकर यांच्या खात्यावर (खाते क्र. १६/१३/१०/१५३) अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यातून (खाते क्र. ५१/१०/१/१०) सव्वा लाख रुपये जमा झाले असून ही रक्कम नेमकी कोठून आली याचा खुलासा व्यवस्थापकांनी केलेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या घोटाळ्याबाबतचा चौकशी अहवाल संचालक बैठकीत मांडावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,  अशी मागणी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर व अभिजित अडसूळ यांनी केली आहे. याबाबत अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

झाले काय?

ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर, अंधेरी पूर्व आदी शाखांमध्ये बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून कोटय़वधींचा अपहार होत असल्याची तक्रार एका सभासदाने थेट नाबार्डकडे केल्यानंतर या घोटाळ्यास वाचा फुटली. नाबार्डच्या आदेशानुसार बँकेच्या दक्षता पथकाने गेले दोन महिने विविध शाखांमध्ये केलेल्या तपासणीतून या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले. कांदिवली पूर्व आणि अशोकवन या दोन शाखांमधील ५५ कर्जप्रकरणे बोगस आढळून आली आहेत. बँकेशी संबंधित काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकरणात कर्जव्यवहाराचे करारपत्र न करताच, पात्रतेपेक्षा अधिक कर्ज मंजूर करणे, नोकरीत कायम न झालेल्या कर्मचाऱ्यांना कर्ज देणे, बनावट दस्तावेजांच्या आधारे कर्ज देणे, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणे केली व त्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे नंतर आपल्या खात्यावर वळते करून घेत हा घोटाळा केला.