यूट्यूबवरील प्रसिद्ध कलाकार जितेंद्र याला पत्नी कोमल अग्रवाल हीच्या मृत्यूप्रकरणी भांडुप पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ‘जितू जान’ नावाने युट्यूबर प्रसिद्ध असलेल्या जितेंद्रच्या पत्नीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पीडितेच्या कुटूंबियांनी जितेंद्रवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी जितेंद्रला अटक केली.

युट्युबर जितेंद्रचे २ लाखांच्या आसपास सबस्काईबर आहेत. जितेंद्रने गाण्यांवर काही व्हिडिओंचे चित्रण केलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आहेत.

जितेंद्रवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (हत्येसंदर्भातील गुन्हा), ३२३ ( दुखापत पोहचवल्याबद्दल शिक्षा), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ५०६ (फौजदारी धमकीच्या गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जितेंद्रने पत्नीची हत्या केली असल्याचा आरोप कोमलच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर जितेंद्रला अटक करण्यात आली. जितेंद्र नेहमी आपल्या पत्नीवर नेहमीच अत्याचार करत होता असा आरोप करत होता असा आरोप कोमलच्या आईने आणि बहीणीने केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पीडितेने आत्महत्या केली की खरोखरच तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. पोलीस त्या अहवालाची वाट पाहत आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.