बेस्ट कर्मचाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप तब्बल १६ तासांनी मागे घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असे आवाहन कामगार नेते शशांक राव यांनी केले आहे. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे झालेल्या त्रासाबद्धल उद्धव ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली.

बेस्ट कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन देण्याचे लेखी आश्वासन देण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी नकार दिला होता. यानंतर बेस्टच्या वाहतूक विभागातील सुमारे ३६ हजार कर्मचाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. सोमवारी ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट बस बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

सोमवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. दुपारी तीनच्या सुमारास बेस्ट कामगार कृती समितीचे सदस्य ‘मातोश्री’वर दाखल झाले. शशांक राव, सुहास सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर संप मागे घेण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असे शशांक राव यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरेंनीही मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तब्बल १६ तासांनी संप मागे घेण्यात आला असून संप मिटल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या तसेच रक्षाबंधनानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. बैठकीत काय तोडगा निघाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

बेस्टला महापालिकेने आर्थिक साहाय्य करावे आणि बेस्टला महापालिकेत सामावून घ्यावे या मागणीसाठी बेस्टचे कर्मचारी व बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वडाळा डेपोबाहेर उपोषण केले होते. मात्र या उपोषणादरम्यान महापालिका व राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन साधी विचारपूस केली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ६ ऑगस्टपर्यंत प्रश्न न सुटल्यास ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्ट बंद करून संप करण्याचा इशारा दिला होता.