मुंबई शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) इलेक्ट्रीक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “या इलेक्ट्रीक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बसेस सुरु असून एकूण ३४० बसेस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रीक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे”, असेही पर्यावरणमंत्री यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा ‘बेस्ट‘ प्रवास :
या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बसची पाहणी केली. एसी बस जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

सीसीटीव्ही :-
या बसेसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसेसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरणार आहेत.

दिव्यांगांसाठी लिफ्ट :-
अपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा अपंग प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.