मुंबईत एका बेस्ट कर्मचाऱ्यालाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट बस सेवा ही मुंबईची दुसरी लाईफलाईन ओळखली जाते. आता याच बेस्टच्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. करोनाची लागण झालेला हा पहिला बेस्ट कर्मचारी आहे. या घटनेने मुंबईकरांची चिंता आणखी वाढली आहे.

करोनाची लागण झालेला हा बेस्टमधील कर्मचारी वडाळा येथील बस डेपोत विद्युत विभागातील आहे. काही दिवसांपासून तो सुट्टीवर होता. हा कर्मचारी सुट्टीवर होता. हा कर्मचारी २१ मार्च रोजी वडाळा डेपोमध्ये गेला होता. त्यानंतर हा कर्मचारी सुट्टीवर होता. २६ मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बेस्टमधून त्याने टिळकनगर ते वडाळा असा प्रवास केला होता. सध्या या कर्मचाऱ्याला मुंबईच्या एसआरव्ही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

बेस्टचा हा कर्मचारी मुंबईतील टिळकनगर भागात रहात होता. हा कर्मचारी ज्या इमारतीत वास्तव्य करत होता ती इमारत सील करण्यात आली आहे. तसंच या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.