हुसैनी इमारत दुर्घटनेचे सावट; इमारतीची पाहणी करण्याची मागणी

हुसैनी इमारत दुर्घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात जुन्या इमारतीत राहणारे रहिवाशी भयभीत झाले असून शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या म्हाडाच्या अभियत्यांना येथील महिला रहिवाशांनी  घेराव घातला. हवालदिल झालेल्या महिलांनी आमच्याही इमारतीची ‘हुसैनी’ होऊ  देणार का? असा सवाल करत आत्ताच्या आत्ता आमच्या इमारतींची पाहणी करण्याची मागणी म्हाडा अधिकाऱ्यांकडे केली.

हुसैनी इमारतीच्या समोरील बाजूस रसूल व मरियम मंजिल या जीर्ण इमारती आहेत. या इमारतींची दुरुस्ती झाल्यावरही भितींना वारंवार तडे जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. शुक्रवारी पाहणीसाठी पोहोचलेल्या म्हाडा अधिकाऱ्यांपुढे त्यांनी हा तक्रारीचा पाढा वाचत दुरुस्तीची मागणी केली. निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे बांधकाम ढासळत आहे, अशी त्यांची तक्रार होती. अखेरीस अधिकाऱ्यांनी महिलांसमवेत इमारतींची पाहणी केली. रसूल व मरियम या दोन्हीं इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. ‘हुसैनी’ कोसळल्यानंतर आपल्या इमारतीचे काय होईल या भीतीपोटी रात्रभर झोप लागली नसल्याचे रसूल इमारतीमधील स्त्रियांनी सांगितले.

तीनमजली रसूल इमारतीमध्ये ६५ कुटुंबे आहेत. काहींची चौथी पिढी या ठिकाणी वास्तव्याला आहे. तळमजल्यावरील दुकाने लाकडी टेकूवर टिकून आहेत. तर पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सुरय्या शेख यांच्या घरातील जमीन खचली आहे. इमारतीच्या मागील भिंतीची अवस्था चिंताजनक असल्याने रहिवाशांनी भिंतीलगत कोणत्याही वस्तू ठेवत नाही. जायदा शेख, शबाना मखमली व शाहिन शेख यांच्या न्हाणीघरातील भिंतीना तडे गेले आहेत. तर कोही ठिकाणी छताची माती सातत्याने खाली पडत असते.

मागील नऊ महिन्यांपासून म्हाडाकडे इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित पडून असल्याची माहिती येथील रहिवाशी तसनीम सुरतवाला यांनी दिली. तसेच दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदार नाममात्र दुरुस्ती करून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यासारखीच अवस्था दोन मजल्याच्या ‘मरियम मंजिल’ इमारतीची देखील आहे. या दुर्घटनेचे सावट बकरी ईदवरही पसरले  आहे.

आमच्या इमारतीची ‘हुसैनी’ झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असे रहिवाशी मधुबाला आझमी यांनी अधिकाऱ्यांना विचारले. आम्ही बहुतांश मध्यवर्गीय आहोत. त्यामुळे इमारत रिकामी करण्याची नोटीस म्हाडाने दिल्यास आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशी हुसेन चस्का यांनी विचारला.

बाजार पुन्हा भरला

बकरी ईदच्या तोंडावर भेंडीबाजारचा परिसर कायम गजबजलेला असतो. परंतु, दुर्घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी येथील बाजार सामसुम होता. शुक्रवारी मात्र येथील बाजार पुन्हा गजबजला. ‘हुसनी’ कोसळल्याचे दु:ख आहे. पण सणासुदीच्या दिवशी दुकान बंद कसे ठेवणार, असा सवाल ‘हादीया स्वीट’च्या मालकाने केला.