मुंबईतील भेंडीबाजार येथे कोसळलेल्या इमारतीतील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. घटनास्थळी रात्रभर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून (एनडीआरएफ) बचावकार्य सुरु असून आत्तापर्यंत ४७ जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली आहे. दुर्घटनेत १५ जखमी झाले असून त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भेंडीबाजार येथे दाटीवाटीच्या परिसरात उभी असलेली ११७ वर्षे जुनी हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळीही घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. दुपारनंतर एनडीआरएफच्या पथकाने मोहीम थांबवली. ब्रिटिशकालीन इमारतीच्या भिंती आणि खांब अत्यंत जाड असल्याने ते हटवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत होती.

बोहरी मोहल्ला परिसरात ही सहा मजली इमारत असून इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले होते. या इमारतीमध्ये १२ निवासी आणि एक व्यावसायिक भाडेकरू होते. इमारतीच्या तळमजल्यावर मिठाई तयार करण्याचा कारखाना होता. या कारखान्यासमोरील गाळ्यात अनेक कामगार राहत होते. या कामगारांपैकी अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून हे कामगार मूळचे बिहारमधील होते.
भेंडीबाजार परिसरातील २५० इमारतींचा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट या ट्रस्टकडून पुनर्विकास सुरु झाला होता. मे २०१७ मध्ये हुसैनी इमारत पाडण्याची परवानगीही मिळाली होती. समूह विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना मंगळवारी मृत्यूने गाठले. या इमारत दुर्घटनेची अप्पर मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

https://twitter.com/ANI/status/903470524226977792