देशभरात सर्वत्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी बाळगली जात असताना मुंबईतील सांताक्रुझ येथे मणिपूरच्या एका महिलेवर एक अज्ञात बाइकस्वार थुंकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्हीद्वारे अज्ञात बाइकस्वाराचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.६) मूळ मणिपूरची रहिवासी असलेली २५ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसोबत गिता विहार जंक्शन येथून अत्यावश्यक सामान घेण्यासाठी कलिनाच्या मिलिटरी कॅम्पच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी अचानक बाइकवरुन आलेला एक व्यक्ती तिच्यावर थुंकला आणि बाइकवरुन पसार झाला. “बाइकस्वार अचानक आला, त्याने मास्क काढलं आणि माझ्यावर थुंकला. त्यानंतर लगेच तो भरधाव वेगात बाइक घेऊन पसार झाला. घडलेल्या प्रकारामुळे आम्हाला धक्का बसला होता. त्यामुळे आम्ही गाडीचा नंबरही पाहू शकलो नाही. या घटनेमुळे करोनाची लागण होण्याची भीती मला आता वाटतेय”, अशी तक्रार महिलेने केली आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्हीद्वारे अज्ञात बाइकस्वाराचा शोध घेतला जात असून आयपीसी कलम २७० आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.