विनाहेल्मेट चालकांकडून १.८९ कोटींची दंडवसुली; मार्चपर्यंत दोन लाखांहून अधिक जणांवर कारवाई
एकीकडे वाहतूक पोलिसांनी मोटारसायकलस्वारांच्या मागे बसणाऱ्या तसेच कारचालकाशेजारी सीटबेल्टशिवाय बसणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका हाती घेतला असतानाच हेल्मेट घालून बाइक चालविण्याच्या नियमांनाच अजून सरावले नसल्याचे दिसून येत आहे. सन २०१६ च्या पहिल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी दोन लाख आठ हजारांहून अधिक चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून एक कोटी ८९ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, शुक्रवारपासून सुरू केलेल्या दुहेरी कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत ९६५२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मोटार वाहतूक कायद्यानुसार मोटारसायकल चालविणाऱ्या प्रत्येक चालकाला हेल्मेट घालण्याची सक्ती आहे. नोव्हेंबर महिन्यापासून त्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. सातत्याने जनजागृती आणि आवाहन करूनही मुंबईकर मात्र या नियमाला मानायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. केवळ जानेवारी २०१६ पासून मार्चपर्यंतच्या कारवाईच्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित केले, तर तीन महिन्यांत शहरात दोन लाख आठ हजार ४०५ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, तर त्यांच्याकडून दंडरूपात एक कोटी ८९ लाख ३५ हजार ७०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

चार दिवसांत ९६५२ जणांवर कारवाई
मोटारसायकलस्वाराच्या मागे विनाहेल्मेट प्रवास करणारे आणि कारमध्ये चालकाशेजारी सीटबेल्टशिवाय बसणाऱ्या सहप्रवाशांवर वाहतूक पोलिसांच्या कारवाईची गाज पडली आहे. अवघ्या चार दिवसांत मुंबईत मोटारसायकलवर विनाहेल्मेट बसलेल्या ६३१७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून सीटबेल्टचा मुलाहिजा न बाळगणाऱ्या ३३३५ प्रवाशांना १०० रुपयांची पावती फाडावी लागली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यामध्ये पूर्व आणि उत्तर मुंबईकरांचा सर्वाधिक समावेश असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
विनाहेल्मेट सहप्रवाशांवरील कारवाई
* २९ एप्रिल – ९२८
* ३० एप्रिल – १,८८१
* १ मे – १,०९५
* २ मे – २४१३
* एकूण – ६३१७

जागृती वाढतेय
हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढत आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना पोलिसांची पर्यायाने कायद्याची भीती वाटू लागली आहे. आकडेवारीवरून अजूनही काही व्यक्ती नियमांचे पालन करत नसल्याचे जरी दिसत असले तरी मला विश्वास आहे की, हळूहळू विनाहेल्मेट मोटारसायकलस्वार ही गोष्ट मुंबईत इतिहास होईल.
– मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त (वाहतूक)

 

Untitled-15