दर एक हजार लोकसंख्येमागे १२.१४ वरून ११.८३ इतका जन्मदर; अर्भक, माता मृत्यूच्या प्रमाणातही घट

मुंबई : मुंबईतील जन्मदर २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबईत दर १००० लोकसंख्येमागे १२.१४ असलेला जन्मदर ११.८३ टक्क्यांवर घसरला आहे.  दर हजारामागे मृत्यूचा दर मात्र तेवढाच आहे. त्यात चांगली गोष्ट ही की, अर्भक मृत्यूचे व माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

पालिके च्या पर्यावरण विभागाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल तयार केला जातो. या अहवालातील आकडेवारीनुसार जन्मदर घसरला असल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार हे वास्तव पुढे आले आहे.

मुंबई हे जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांपैकी एक असून दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांचे शहर म्हणून त्याची ओळख आहे. कमी जागेवर खूप जास्त लोकसंख्या असल्यामुळे येथील पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. त्यामुळे मुंबईच्या लोकसंख्येचा वॉर्डनिहाय लेखाजोखा पालिकेने आपल्या पर्यावरण विषयक अहवालात मांडला आहे. मुंबईतील लोकसंख्येची घनता २६,४५३ प्रति चौ. किलोमीटर  इतकी आहे. याचा अर्थ एक किलोमीटर पसरलेल्या भूभागावर मुंबईत २६, ३५७ लोक राहतात.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मालाड कांदिवली परिसरात सर्वाधिक लोकसंख्या आहे. जनगणना दर दहा वर्षांनी होते. परंतु, मुंबईत पालिका आरोग्य विभागही आपल्या परिने लोकसंख्येची माहिती ठेवत असते. या आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी २७ लाख इतकी असेल. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ६७ हजार ९४ मुंबईकर पी उत्तर वॉर्डात म्हणजेच मालाड, कांदिवली परिसरात राहणारे असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या बी वॉर्डात माझगाव, डोंगरी या परिसरात आहे.