X
X

मुंबईतील शाळांमध्येही वंदे मातरम् बंधनकारक करा; भाजप नगरसेवकाची मागणी

संदीप पटेल यांचा प्रस्ताव

तामिळनाडूतील शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम् बंधनकारक करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईतील शाळांमध्येही वंदे मातरम् गाणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी या मागणीचा प्रस्ताव मांडला आहे. महापालिका आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं, असं त्यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे.

भावी पिढीत देशभक्ती जागृत राहावी यासाठी शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गायला हवं. महापालिका सभागृहाच्या धर्तीवर स्थायी, सुधार आणि अन्य समित्यांच्या कामकाजालाही वंदे मातरम् या गीतानं सुरुवात करायला हवी, असंही त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. दरम्यान, पटेल यांच्या प्रस्तावावर पुढील महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी तामिळनाडूतील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वंदे मातरम गायलाच हवं. आठवड्यातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायला हवं, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. सरकारी कार्यालये, संस्था, खासगी कंपन्या आणि अन्य कारखान्यांमध्ये महिन्यातून किमान एकदा हे राष्ट्रीय गीत गायला हवं. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्यास कुणाचा आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पण त्याचं कारण वैध असलं पाहिजे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आपण वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्याचे पडसाद राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अबू आझमी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या देशात राहायचं असल्यास वंदे मातरम् म्हणावंच लागेल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. आता मुंबईतील शाळांमध्येही वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवकाच्या या मागणीच्या प्रस्तावावर महापालिकेच्या पुढील महासभेत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20
First Published on: August 9, 2017 10:07 am
  • Tags: vande-mataram,
  • Just Now!
    X