भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज(दि.१२) गुरुवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अधिका-यांच्या बेजबाबदार वृत्तीचा निषेध करण्यासाठी अनोखं आंदोलन केलं. खासदारांनीच एसआरए प्रशासनाविरोधात आंदोलन केल्याने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी घरांच्या लॉटरीसाठी संबंधित पात्र रहिवाशांकडून 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करतात, असा आरोपही गोपाळ शेट्टी यांनी यावेळी केला.
मालाड पश्चिम येथील राठोडी स्थित तक्षशिला सहकारी गृहनिर्माण संस्थेची (एसआरए प्रकल्प) इमारत गेल्या दोन वर्षांपासून पूर्णावस्थेत आहे. असं असतानाही एसआरए अधिका-यांच्या चालढकल करण्याच्या प्रवृत्तीमुळे या संस्थेतील सदस्यांना घरं हस्तांतरीत करण्यात आली नाहीत. याचा निषेध करण्यासाठी शेट्टी यांनी ९८ पात्र, २३ अपात्र आणि पोटमाळ्यावर (loft mezzanine floor) राहणा-या ३५ झोपडीधारकांना घराचा ताबा दिला. यावेळी बोलताना, “अधिकारी घरांच्या लॉटरीसाठी संबंधित पात्र रहिवाशांकडून 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करतात”, असा आरोप शेट्टी यांनी केला. तसंच, “जर अधिकाऱ्यांना त्यांच्या बायकांसाठी दागिने घ्यायचे असतील तर त्यांनी मला सांगावं. मी एक खासदार म्हणून त्यांच्या दागिन्यांसाठी पैसे गोळा करेन” असा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी यावेळी लगावला.
पहा व्हिडीओ –
“देवेंद्र फडणवीस सरकारच्या सुधारित झोपडपट्टी कायदा २०१७ आणि अधिकृत गॅझेट २०१८ यांमध्ये यासंबंधीच्या नियमाचा स्पष्ट उल्लेख आहे. तसंच या निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी लिखित रुपात मान्यता दिलेली आहे. असं असतानाही असंवेदनशील अधिका-यांमुळे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, आणि त्यामुळे कष्टकरी कुटुंबांना स्वत:च्या हक्काच्या घरात जाता येत नाही, याचा निषेध करण्यासाठीच मी हे आंदोलन केलं”, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही २०२२ पर्यंत प्रत्येक देशवासीयाला पक्कं घर देण्यासाठी वचनबद्ध आहेत, आणि त्यादृष्टीने कामं प्रगतिपथावर आहेत. मात्र, काही बेजबाबदार अधिका-यांमुळे अशा चांगल्या कामांमध्ये दिरंगाई होते”, असंही गोपाळ शेट्टी यावेळी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 2:36 pm