भाजपचे भांडुपमधील ब्लॉक अध्यक्ष वसंत पाटील (५५) यांची सोमवारी सकाळी राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर चॉपरने २८ वार करण्यात आले होते. प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातूनच ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, काँग्रेसचा कार्यकर्ता बबन खोपडे (५२) याला अटक करण्यात आली आहे.
वसंत पाटील हे पत्नीसह भांडुप पूर्व येथील जयभवानी चाळीत राहात होते. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पत्नी शौचालयास गेली असता घरात शिरलेल्या खोपडे याने पाटील यांच्यावर चॉपरने वार केले व पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचे रुग्णालयात निधन झाले.
पाटील आणि खोपडे यांच्यात पाच वर्षांपासून वैमनस्य होते, मात्र ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली नव्हती. खोपडे याचा चाळीतील छोटी बांधकामे करण्याचा व्यवसाय होता. त्याविरुद्ध पाटील महापालिकेत तक्रारी करीत असत. त्यामुळे खोपडेला खूप नुकसान सोसावे लागत होते. यातून दोघांमधील भांडणे वाढत गेली. त्यातच रविवारी सायंकाळी दुर्गामाता मंदिरासमोर या दोघांमध्ये वाद झाला. भांडण इतके विकोपाला गेले की, खोपडे याच्या अंगावर थुंकून पाटील निघून गेले. हा राग मनात ठेवून खोपडे सकाळी जयभवानी चाळीत आला. पाटील एकटे आहेत हे पाहून तो घरात शिरला आणि त्याने त्यांची हत्या केली, असे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीरंग नाडगौडा यांनी सांगितले.