News Flash

मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, मुलुंड स्थानक बॉम्बस्फोटांप्रकरणी तिघांना जन्मठेप

खटल्यातील अन्य दोषी साकीब नाचन, अतिफ मुल्ला, हसीब मुल्ला, गुलाम कोटला यांना दहा वर्षांची शिक्षा

मुंबईला हादरवणाऱ्या या खटल्याचा विशेष ‘पोटा’ (दहशतवाद प्रतिबंधक कायदा) न्यायालयाने १३ वर्षांनंतर निकाल देत १३ पैकी १० आरोपींना दोषी ठरवले होते.

मुंबई सेंट्रल स्थानकातील मॅक्डोनाल्डमध्ये, विलेपार्ले पूर्व परिसरातील बाजारात, तर सीएसटी-कर्जत लोकलमधील महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात मुलुंड स्थानकात डिसेंबर २००२ ते मार्च २००३ यादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी प्रमुख दोषी मुझम्मिल अन्सारी याच्यासह फरहान खोत, वाहिद अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा बुधवारी सुनावण्यात आली. खटल्यातील अन्य दोषी साकीब नाचन, अतिफ मुल्ला, हसीब मुल्ला, गुलाम कोटला या चौघांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मोहम्मद कमील, अन्वर अली खान, नूर मलिक यांना दोन वर्षांची शिक्षा झाली.
मुंबईला हादरवणाऱ्या या खटल्याचा विशेष ‘पोटा’ (दहशतवाद प्रतिबंधक कायदा) न्यायालयाने १३ वर्षांनंतर निकाल देत १३ पैकी १० आरोपींना दोषी ठरवले होते. तिन्ही स्फोटांचा मुख्य सूत्रधार नाचन व मुझम्मिल यांच्यासह अतीफ मुल्ला, हसीब मुल्ला, गुलाम कोटल, मोहम्मद कमील, नूर मलिक, अन्वर अली खान, फरहान खोत आणि वाहिद अन्सारी यांना विशेष ‘पोटा’ न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी दोषी ठरवले, तर नदीम पाबोला, हारूण लोहार आणि अदनान मुल्ला या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. नाचन आणि मुझम्मिलसह एकूण १५ आरोपींवर खून, हत्येचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बॉम्बस्फोटांचा कट रचणे या भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांअंतर्गत तसेच शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके कायदा, रेल्वे कायदा आदींअंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते; परंतु, दोन आरोपींचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नाचनसह १३ जणांवरच खटला चालवण्यात आला. न्यायालयाने नाचन व मुझम्मिलसह १० जणांना दोषी ठरवले. त्यातही मुझम्मिलला बॉम्ब ठेवण्याच्या मुख्य आरोपासह एकूण १८ आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. सर्व आरोपी हे ‘सिमी’चे सदस्य होते. या काळात ‘सिमी’वर बंदी घालण्यात आलेली नव्हती. बाबरी मशीद आणि २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीचा सूड उगवण्यासाठी या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात आला.या तिन्ही बॉम्बस्फोटांमध्ये १२ निष्पापांना जीव गमवावा लागला होता, तर १४१ लोक जखमी झाले होते व त्यातील २७ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:13 pm

Web Title: mumbai blast in 2002 2003 four convicted gets life imprisonment
Next Stories
1 VIDEO: राहुलने प्रत्युषाचा छळ करून तिला संपवले; प्रत्युषाच्या आईचा आरोप
2 भुजबळ कुटुंबिय कर्जबुडव्यांच्या यादीत; नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई
3 Video : आता गारेगार लोकल प्रवास
Just Now!
X