१३/७च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी नकी अहमद वसी अहमद शेख (वय २८) याच्यावर सोमवारी दुपारी तळोजा तुरुंगात अन्य कैद्याने धारदार पत्र्याने जोरदार हल्ला चढविला. तुरुंगाच्या ‘अंडा सेल’मध्ये  हा प्रकार घडला. अमीर मोईनुददीन खान असे या हल्लेखोराचे नाव असून तो या अतिसुरक्षित कक्षात शेखसह बंदी होता. या हल्ल्यातून शेख बचावला.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला घडल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. याआधी जून महिन्यातही खान याने विजय केदारी या कैद्यावर अशाच हत्याराने हल्ला केला होता.  हा हल्ला कसा घडला, खान याच्याकडे धारदार पत्रा कुठून आला, याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी लोकसत्ताला सांगितले.

दोन आठवडय़ांपूर्वी पाण्यावरून या दोघांमध्ये वाद घडला होता. त्यातून हा हल्ला झाला. खानने धारदार पत्रा त्याच्या मानेवरून फिरवला. या हल्ल्यानंतर शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खारघर पोलिसांनी आरोपी खानविरोधात गुन्हा नोंदवला असून गेल्या पाच महिन्यातला खानविरोधातला अशा प्रकारचा हा दुसरा गुन्हा आहे.

१३ जुलै २०११ रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे काही मिनिटांच्या फरकाने शक्तिशाली बॉम्बस्फोट घडले. त्यात २६ जण ठार तर सुमारे दीडशे जण जखमी झाले होते. दहशतवादविरोधी पथकाने जानेवारी २०१२मध्ये शेखला अटक केली. अतिरेक्यांना हबीब मंझीलमध्ये जागा देणे, सीम कार्ड मिळवून देणे, दिल्लीहून आलेली स्फोटके मुंबईत उतरवून घेणे व ती साथीदारांच्या ताब्यात देणे, बॉम्ब ठेवण्यासाठी दोन दुचाकी चोरणे; या कारवाया शेखने केल्याची माहिती एटीएसच्या तपासातून पुढे आली होती.