पादचाऱ्यांचा हक्क हिरावून पदपथावर उपाहारगृह, व्यावसायिक आस्थापने आणि दुकानदारांकडून करण्यात येणाऱ्या अतिक्रमणावर हातोडा चालविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आपापल्या विभागांमध्ये सर्वेक्षण करून अतिक्रमणांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईतील पदपथांना अतिक्रमणापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये अनेक उपाहारगृहे, व्यावसायिक आस्थापने आणि दुकानदारांनी मोठय़ा प्रमाणावर पदपथांवर अतिक्रमण केले आहे. संध्याकाळी अंधार पडू लागताच उपाहारगृहाबाहेरील जागेत टेबल-खुच्र्या मांडून खवय्यांसाठी मेजवानीचा थाट मांडण्यात येतो. बहुसंख्य दुकानदारांनी पदपथावर पायऱ्या आणि ओटे बांधून पादचाऱ्यांना अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करीत पदपथावरून मार्गक्रमण करावे लागते. या अडथळ्यांचा त्रास टाळण्यासाठी पादचाऱ्यांना नाईलाजास्तव वाहनांची ये-जा सुरू असलेल्या रस्त्यावरून चालावे लागते. परंतु त्यामुळे पादचाऱ्यांना छोटय़ा-मोठय़ा अपघातांचा सामना करावा लागतो. तसेच रस्त्यावर पादचाऱ्यांचा वावर वाढल्यानंतर वाहतूक कोंडीचे प्रकार अधूनमधून घडतात. पादचाऱ्यांचा द्राविडीप्राणायाम टाळण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पदपथांवरील उपाहारगृहे, व्यावसायिक आस्थापने आणि दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
बुधवारी आणि गुरुवारी विशेष मोहीम राबवून आपापल्या विभागांमधील पदपथांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अजय मेहता यांनी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यासाठी विभागस्तरावर आवश्यकतेनुसार पाहणी पथके तयार करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. सर्वेक्षणादरम्यान सर्व संबंधित पथकांनी पदपथांवरील अतिक्रमणांची छायाचित्रे घ्यावीत आणि नियम व कार्यपद्धतीनुसार पदपथांवर व्यावसायिक आस्थापने, उपाहारगृहांनी केलेली अतिक्रमणे हटवावीत. तसेच याबाबतचा अहवाल नियमितपणे उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) यांच्यामार्फत पालिका आयुक्त कार्यालयात सादर करावा, असेही आयुक्तांनी सूचित केले आहे.