मुंबई : मुंबईतील करोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती यापुढे गूगल मॅपवर मिळणार आहे. करोना जागतिक महामारीच्या काळात मुंबई महापालिकेने या प्रकारचा प्रयोग सर्वात प्रथम केला असून अन्य देशही त्याचे अनुकरण करू लागले आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. तरीही प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने गूगल मॅपची मदत घेऊन प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती गूगलवर दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित ही सेवा उपलब्ध करून देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेला गूगलने पूर्ण सहकार्य केले असून त्याचा मोबदलाही घेतलेला नाही.

हे करा

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणाऱ्या अद्ययावत माहितीनुसार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहाता येतील. त्यासाठी मोबाइलवर गूगल मॅप हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केल्यानंतर ‘कोविड १९ इन्फो’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा ‘झूम’ करून पाहाताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड १९ कन्टेनमेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरू झाली असून त्यामध्ये वेळोवेळी अद्ययावत बदल केले जातील. भूगोल जीआयएस आणि जेनेसीस यांचाही महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये हातभार लागला आहे. गूगल मॅपवर ‘कोविड १९ इन्फो’  हा पर्याय निवडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका या पर्यायावर क्लिक केले तर थेट महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरstopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर करोनाविषयक संपूर्ण माहितीदेखील पाहाता येते.