मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या येत्या जानेवारी महिन्यातील सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कामांना सुरूवात होईल. या काळात पालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे पालिकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आयुक्त अजोय मेहता यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न घेण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांपैकी ५० हजार कर्मचारी निवडणुकीची कामे करणार आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये साधारण ८,५०० मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रावर पाच अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. याशिवाय, १० टक्के अतिरिक्त कर्मचारी आपातकालीन परिस्थितीसाठी तैनात ठेवावे लागतात. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी कचरा उचलण्यापासून , रस्ते दुरूस्ती, आरोग्य, शाळा अशा कामांमध्ये हे कर्मचारी व्यग्र असतात. यापूर्वीच्या मे २०१६ मध्ये पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी आयुक्त मेहता यांनी महापालिकेच्या  २४ वॉर्डातील सहआयुक्त आणि उपायुक्तांच्या साप्ताहिक व अन्य रजा रद्द केल्या होत्या.

फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच प्रभागांची उलथापालथ झाली आहे. मागील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी ५३,१२१,१४२,२००,२१० व २२५ हे प्रभाग महिला ‘एससी’ आणि ५९ हा प्रभाग महिला ‘एसटी’ उमेदवारांसाठी राखीव असतील.
ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन प्रभाग कमी होणार आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक प्रभाग वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन प्रभाग वाढले आहेत.
पश्चिम उपनगरात एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक प्रभाग कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील प्रभागांची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन प्रभाग वाढणार आहेत. नवीन प्रभागरचनेनुसार ५४ ते ५५ हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल असा अंदाज आहे. सध्या बहुतांशी प्रभाग हे रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस विस्तारलेले आहे. त्यामुळे नवीन रचनेत रेल्वेमार्गामुळे प्रभाग छेदले जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.