महापालिकेच्या आठ रुग्णालयांचा समावेश

मुंबई महापालिकेच्या आठ रुग्णालयांसह १९ रुग्णालयांमध्ये करोनाविषयक चाचणी आणि उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबईत पहिला करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. परदेशवारी करून आलेल्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात अथवा त्यांच्याच घरात वेगळे राहण्याची सुविधा करण्यात आली. मुंबईमधील करोनाबाधित व संशयितांची संख्या वाढू लागली.  सुरुवातीला पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणीची व उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता आठ आणि खासगी ११ रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या रुग्णालयांमध्ये करोना चाचणी आणि उपचार

पालिका रुग्णालये : केईएम सर्वोपचार रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय, भाभा रुग्णालय, वांद्रे, भाभा रुग्णालय, कुर्ला, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर

खासगी रुग्णालये : ब्रिच कँडी, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, लीलावती रुग्णालय, रहेजा रुग्णालय, हिंदुजा रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल, वोक्हार्ट रुग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, नानावटी रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय.

घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला

करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या मुंबईकरांना घरबसल्या या डॉक्टरांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधता येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-४७०-८५-०-८५ वर सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत ही सेवा उपलब्ध राहील. मुंबईमधील करोनाबाधित आणि संशयीतांची संख्या हळूहळू वाढत आहे. दुसरीकडे वारंवार इशारे देऊनही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिके ने आपली डॉक्टरांची फौज अशा मुंबईकरांसाठी तैनात केली आहे. हे डॉक्टर मोफत सल्ला देतील.

रोगाची लक्षणे वाटत असलेल्या नागरिकांना या डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या शंकाचे निरसन करुन घेता येईल. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे. असे वाटल्यास ती कुठे करावी याबाबत मार्गदर्शन करतील. तसेच संबंधितांना आपल्या आरोग्याविषयी दूरध्वनीवरूनच डॉक्टरांकडे पाठपुरावा करता येईल.

खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे, संपर्क क्रमांक

  •  सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२-६१७०-००१९
  •   थायरोकेअर : ९७०२-४६६-३३३
  •   मेट्रोपोलीस : ८४२२-८०१-८०१