गेल्या काही महिन्यांमध्ये उंच इमारतींना लागलेल्या आगीची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने उंच इमारती, मॉल्स, व्यावसायिक इमारती आणि हॉटेल्समधील अग्निसुरक्षा यंत्रणेच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे. अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्याने ३०८ इमारतींवर अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. मात्र सूचना करूनही अग्निसुरक्षा यंत्रणेत सुधारणा न करणाऱ्या वांद्रे येथील केनिल वर्थ मॉल, अंधेरी-कुर्ला मार्गावरील प्रमुख प्लाझा आणि ऑपेरा हाऊस येथील पारेख मार्केटविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आगीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईमधील उंच इमारती, मॉल्स आणि तारांकित हॉटेलमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश जुलैमध्ये अग्निशमन दलाला दिले होते. त्यानुसार अग्निशमन दलाने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल ५०७ इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. त्यापैकी ३०८ इमारतींमधील यंत्रणेत त्रुटी आढळून आल्यामुळे या इमारतींवर नोटिसा बजावण्यात आल्या. यापैकी ७३ इमारतींमधील यंत्रणेत सुधारणा करण्यात आली आहे. मात्र यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी २७८ इमारतींना मुदत देण्यात आली असून संबंधितांनी त्याबाबत हमी दिली आहे. मुदतीत त्रुटी दूर न करणाऱ्या इमारतींविरुद्ध अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा अधिनियम २००६ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने घेतला आहे. मुदतीत यंत्रणेतील त्रुटी दूर करणाऱ्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. मात्र तरीही यंत्रणेत सुधारणा न करणाऱ्यांच्या इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरातील लिंक स्क्वेअर मॉल, लिंक कॉर्नर मॉल, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज मॉल, श्रीजी प्लाझा, न्यू ब्युटी सेंटर, केनिल वर्थ मॉल, हायलाईफ मॉल, रिलायन्स हायपर मॉल, सबर्बिया मॉल, रिलायन्स ट्रेन्ड्झ मर्यादित, ग्लोबस स्टोअर्स या ११ मॉल्सवरही अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. आग लागल्यानंतरही इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणेत सुधारणा न करणाऱ्या पाच इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून त्यात बाटा शू लिमिटेड गाला कमर्शियल, वांद्रे लिंकिंग रोडवरील केएफसी मॉल, अंधेरी-कुर्ला मार्गावरील प्रमुख प्लाझा, मालाड (प.) येथील पाम स्प्रिंग इमारत व चेंबूरमधील डॉ. सुराणा नर्सिग होमचा समावेश आहे. यापैकी प्रमुख प्लाझा वगळता इतर इमारतींमधील सुरक्षाविषयक यंत्रणेत सुधारणा करण्यात आली आहे. नोटीस बजावूनही नियमांनुसार कारवाई न करणाऱ्या वांद्रे येथील केनिल वर्थ मॉल, अंधेरी-कुर्ला येथील प्रमुख प्लाझा व ऑपेरा हाऊसच्या पारेख मार्केटविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.