मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी फक्त म्हाडाचा एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षी म्हाडाची लॉटरी कधी निघणार? त्याची सर्वसामान्यांना प्रतिक्षा असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मुंबईमध्ये एक हजार घरांची लॉटरीची सोडत निघणार आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.

प्रकाश मेहता म्हणाले, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई म्हाडाची लॉटरी जाहीर होईल. लॉटरीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल. कोणत्या भागात किती घरे, नेमकी तारीख कोणती वगैरे सर्व माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सोडत होणाऱ्या लॉटरीत पंतप्रधान आवास योजनेची घरं नसतील. मात्र, 90% घरं अल्प, मध्यम उत्पन्न गटातील असतील. म्हाडाकडे मुंबईत घरं बनवण्यासाठी आता पुरेशी जागा नाही, मात्र येत्या 2 वर्षात एसआरए, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार असल्याची घोषणा प्रकाश मेहता यांनी केली.

म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीच्या 9,018 घरांची सोडत शनिवारी झाली.