News Flash

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लसीकरण केंद्राबाहेर लागले ‘Vaccine out of stock’ चे फलक

अनेक वयस्कर नागरिकांना लस न घेताच घरी जावं लागलं

फोटो सौजन्य: एएनआय

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या करोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील लसीकरण केंद्रातील लसींचा पुरवठा संपल्याचे बोर्ड केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळेच या लसीकरण केंद्राबाहेर व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक म्हणजेच लसी संपल्या आहेत असा बोर्ड झळकलाय.

या लसीकरण केंद्राचे प्रमुख असणाऱ्या राजेश डेरे यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती दिली. कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात होते. हे डोस मंगळवार सकाळपासून येथे नोंदणी करुन येणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेत. मात्र त्यानंतर येथे लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे आता पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागणार असल्याचं डेरेंनी स्पष्ट केलं आहे. दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सीनचे दोन हजार डोस उपलब्ध असून ते आज दिवसभरात दिले जाणार असल्याचंही डेरे म्हणाले.

“संध्याकाळपर्यंत आम्हाला कोव्हिशील्डचे डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं आहे. असं झाल्यास पुन्हा लसीकरण सुरु केलं जाईल. कोविशील्डच्या लसी संपल्यासंदर्भात आम्हाला काल रात्री उशीरा माहिती मिळाली,” असंही डेरे म्हणालेत.

लस टंचाईचा सलग तिसरा दिवस…

मुंबईतील लस टंचाईचा मंगळवार हा सलग तिसरा दिवस ठरला आहे. सोमवारीच मुंबईत ३१ खासगी लसीकरण केंद्र लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात आली. दिवसभरात लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्रही दिसून आलं. सोमवारी केवळ ३५ हजार ३०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १० हजार लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला.

लसींचा तुटवडा ठरतोय अडथळा…

केंद्र सरकारने एकीकडे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईत अद्याप पहिल्या दोन टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण वेगाने झालेले नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिके ने मुंबईतील केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र लससाठ्याअभावी हा वेग अद्याप कमीच आहे. मुंबईत सध्या लसीकरणासाठी १२९ केंद्र आहेत. त्यापैकी पालिके ची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७ आणि खासगी रुग्णालयातील ७३ केंद्र आहेत. मात्र यापैकी ३१ केंद्र सलग दोन दिवस बंद ठेवावी लागली आहेत.

मुंबईतील लसीकरणाची स्थिती काय?

मुंबईत गेल्या आठवड्यापर्यंत ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण एका दिवसात होत होते. मात्र सोमवारी ३५,३०९ लोकांचेच लसीकरण होऊ शकले. खासगी केंद्रांवर जेमतेम ५८५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले मुंबईत आतापर्यंत २० लाखाहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख ६१ हजार नागरिाकांच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 2:09 pm

Web Title: mumbai boards reading vaccine out of stock put up outside bkc vaccination center scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात; दोन ठार, भाजपा नगरसेवक बचावले
2 लाल रंगातील वाहनांसाठी ‘विशेष मार्गिका’
3 प्राणवायूच्या साठय़ावर नजर
Just Now!
X