X
Advertisement

cyclone tauktae : मुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम

या चक्रीवादळाचा परिणाम रविवारी सायंकाळपासूनच मुंबईवर दिसू लागला होता.

मुंबई : मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला तडाखा दिला. मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.

या चक्रीवादळाचा परिणाम रविवारी सायंकाळपासूनच मुंबईवर दिसू लागला होता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रविवार रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. मुंबईचा सोमवारचा दिवस उजाडला तोच कुंद वादळी हवा, सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसासह. सकाळपासून सुरू झालेली संततधार अगदी रात्री उशिरापर्यंत टिकून होती. एरव्ही मे महिन्यात मोसमी पावसाची चाहूल देण्याइतपत वळीवाच्या एखाद- दुसरी सर मुंबईत बरसते. परंतु चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम सोमवारी झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १९४ मिलिमिटर पावसाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने केली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पाऊस कोसळत होता. यापूर्वी आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला. कुलाबा केंद्राने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १८९.२ मिमी पाऊस नोंदवला. मध्य आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत २०० मिमीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली.

वादळी प्रवास

केरळ, कर्नाटक, गोवा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड किनारपट्टीला हादरवून सोमवारी सकाळी तौक्ते चक्रीवादळ मुंबईजवळ सरकले. दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या किनारपट्टीपासून समुद्रात १२० किमी अंतरावर होते. वादळ पुढे सरकण्याचा वेग हा साधारण ताशी १५ किमी असल्यामुळे उशिरापर्यंत मुंबईच्या भागात वादळाचा परिणाम राहिला. मुंबईत सरासरी १०८ किमी ताशी या वेगाने वारे वाहात होते. कुलाबा येथील अफगाण चर्च परिसरात दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग १११ किमी ताशी असा नोंदवला गेला. त्यानंतरही वादळाची तीव्रता वाढतच गेली आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथे ताशी ११४ किमी वेगाची नोंद झाली. गेल्यावर्षी निसर्ग वादळ अलिबागमध्ये धडकलेले असताना तेथील वाऱ्यांचा वेग हा सरासरी १२० किमी ताशी नोंदला गेला होता. ऐन मे महिन्यात मुंबईकरांनी खवळलेला समुद्र, उसळलेल्या लाटा पाहिल्या. सायंकाळनंतर हळूहळू वाऱ्याचा वेग कमी झाला तर रात्री ८ नंतर पाऊसही काहिसा ओसरला. मात्र मुंबईलगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्य़ांमध्ये मात्र सोमवारी रात्रीही मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची हजेरी होती.

अनेक ठिकाणी पडझड, वाहतूक विस्कळीत

मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी भिंती कोसळल्या, तर अनेक ठिकाणी छताचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वीजप्रवाहही खंडीत झाला होता. उपनगरीय रेल्वे वाहतूक, विमान वाहतुकीवरही वादळाचा परिणाम झाला. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर फांद्या पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद झाली. रस्त्यांवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते.

मोठी हानी टळली

सध्या मुंबईत जमावबंदी आहे. बहुतांशी कार्यालयांतील कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे मुळातच वर्दळ कमी झाली आहे. रस्त्यांवर तुरळक गाडय़ा सोमवारी होत्या. रेल्वेसाठीही गर्दी कमी होती. वर्दळ घटल्यामुळे वादळाचा तडाखा मोठा असला तरी फार हानी झाली नाही. वादळातील पडझडीच्या घटनांमध्ये सहा नागरिक किरकोळ जखमी झाले. त्याचप्रमाणे एक नौका बुडली मात्र त्यावरील एकूण चार खलाशांचा जीव वाचवण्यात आला तर एक खलाशाचा शोध सोमवारी उशीरापर्यंत लागू शकला नाही.

आतापर्यंतची वादळे

अरबी समुद्रातील वादळे ही केरळ किंवा कर्नाटकजवळ तयार होतात. त्यानंतर बहुतेकवेळा ती ओमान किंवा गुजरातच्या दिशेने सरकल्याचा इतिहास आहे. मुंबईत यापूर्वी १३८ वर्षांपूर्वी म्हणजे १८८२ मध्ये मोठे चक्रीवादळ झाले होते. त्यानंतर आलेल्या काही वादळांचे मुंबईवर परिणाम झाले मात्र, बहुतेक वादळांचा मोठा फटका मुंबईला बसला नाही. नजीकच्या कालावधीत २००९ मध्ये आलेल्या फयान चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम झाला. मात्र तेही मुंबईला धडकले नाही तर त्याच्या जवळून सरकले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ओखी चक्रीवादळाचा ईशारा देण्यात आला होता.  मात्र, त्याची तीव्रता समुद्रातच कमी झाली होती. वायू हे चक्रीवादळही २०१७ ला निर्माण झाले मात्र तेही गुजरातकडे सरकले. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, वादळ रायगड येथे धडकले त्यानंतर मुंबईला त्याची तीव्रता विशेष जाणवली नाही.

21
READ IN APP
X