ठाणेकरांपुढे वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने तब्बल १३ वर्षांपूर्वी आखलेला जलद वाहतुकीचा नियोजित मार्ग मुंबई महापालिकेच्या परवानगीनेच मुंबईतील बडय़ा बिल्डरांच्या घशात गेल्याची धक्कादायक माहिती असून,  या आरक्षित मार्गावर मोठी गृहसंकुले उभी राहिल्याचे स्पष्ट होत आहे. या दोन्ही शहरांच्या महापालिकांत सत्ता भोगणारे शिवसेना नेते याबाबतीत नेमके काय करत होते, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ठाणे महापालिकेने १९९९ मध्ये तयार केलेल्या विकास आराखडय़ात मुलुंड (पूर्व) येथून या मार्गाचे नियोजन केले होते. त्यासाठी हा सर्व परिसर आरक्षित करण्यासाठी काही बैठकाही या दोन महापालिकांमध्ये झाल्या होत्या. ठाणे महापालिका शहर विकास विभागाने वेळोवेळी चर्चा केली होती. असे असताना ठाणे महापालिकेला  मुंबई महापालिकेने वाकुल्या दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणेकरांना वाहतुकीसाठी उपनगरी रेल्वेचा एकमेव मोठा पर्याय उपलब्ध असून, महापालिकेने १९९९ च्या विकास आराखडय़ात मुंबई-ठाण्याला जोडू शकणाऱ्या जलद वाहतुकीचा मार्ग (हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट) आरक्षित केला होता. हा मार्ग ठाणे पूर्व येथील कोपरी येथून सुरू होऊन मुंबई महापालिकेच्या हद्दीत मुलुंड येथील सध्या उभ्या राहिलेल्या हरिओमनगर संकुलातून पूर्व द्रुतगती महामार्गावर तीनहात नाका असा आरक्षित होता. तीनहात नाका परिसरातून पुढे नितीन कंपनी जंक्शन, तेथून वागळे इस्टेट, पाचपाखाडी, म्हाडा वसाहत, पोखरण मार्ग ओलांडून उपवन तलावाच्या दिशेने पुढे घोडबंदर मार्गापर्यंत या जलद वाहतुकीची रचना होती. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात या सगळ्या मार्गावर आरक्षण टाकण्यात आले. मात्र, जलद वाहतुकीच्या या आरक्षणावर जागोजागी अतिक्रमणांचा वेढा पडला तर मुंबईच्या हद्दीत गृहसंकुले उभी राहिली आहेत.  
दरम्यान, गेली १३ वर्षे याविषयी मूग गिळून असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने मुलुंडमधील ज्या भूखंडांवर विकास झालेला नाही, ती जागा जलद मार्गासाठी आरक्षित ठेवावी, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेपुढे ठेवला आहे.