08 July 2020

News Flash

तपासचक्र : गॅरेज व्यवसायातून चौर्यकर्म

अंधेरी भागात राहणारा २४ वर्षीय सुमीत सिंग वरळी भागातील एका व्यापाऱ्याकडे कारचालक म्हणून काम करत होता.

एके दिवशी झवेरी बाजारातील एका सोने-चांदी व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाली.

 

अंधेरी भागात राहणारा २४ वर्षीय सुमीत सिंग वरळी भागातील एका व्यापाऱ्याकडे कारचालक म्हणून काम करत होता. कामावरून रात्री परतताना तो कारची चावी मालकाच्या इमारतीमधील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये ठेवत असे. सुरक्षारक्षकासोबत त्याची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी सुमीतने नोकरी सोडल्यानंतरही केवळ सुरक्षारक्षकाला भेटण्यासाठी तो अधूनमधून या इमारतीत येत असे.

महिनाभरापूर्वी तो सहजच सुरक्षारक्षकाला भेटायला गेला आणि त्यावेळेस त्याने केबिनमधून कारची चावी चोरली. त्यानंतर ही चावी त्याने त्याचा मित्र रवींद्र शर्मा याला दिली आणि त्याने पुढे ती रणजीत चौधरी याला दिली. रवींद्र आणि रणजीत हे दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळे त्यांची कारागृहात असताना ओळख झाली होती. यातूनच त्यांनी सुमीतच्या मदतीने कार चोरीचा बेत आखला होता. ठरल्याप्रमाणे रणजीतने पहाटेच्या सुमारास इमारतीच्या आवारातून कार चोरली आणि त्यानंतर ते कारच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत होते. त्याचवेळेस त्यांना घोडबंदर भागात एक ग्राहक मिळाला आणि त्यांचा कार विक्रीचा सौदा पक्का झाला. या व्यवहाराची माहिती एका खबऱ्याकडून ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाला मिळाली. त्या आधारे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे आणि भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास घेवारे यांच्या पथकाने सापळा रचून रणजीत व महमद शेख या दोघांना कारसह जेरबंद केले.

आठ-दहा वर्षांपूर्वी मुंबईतील जोगेश्वरी परिसरात रणजीतचे गॅरेज होते. या ठिकाणी महमद हा त्याच्याकडे काम करीत होता. त्यामुळे या दोघांनाही वाहनाविषयी बरेच ज्ञान होते. त्यातूनच झपटप पैसे कमविण्यासाठी त्यांनी वाहन चोरी सुरू केली. वाहनांची काच फोडून किंवा दरवाजाचा लॉक तोडायचे. त्यानंतर वाहन सुरू करण्यासाठी असलेल्या चावीचे किट तोडून त्याठिकाणी दुसरे किट बसवून वाहन चोरायचे, अशी त्याची चोरीची कार्यपद्घत होती. अशाप्रकारे दोघांनी आतापर्यंत २६ वाहनांची चोरी केली असून त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत, असे पोलीस चौकशीतून पुढे आले. तसेच दोघांकडून जप्त करण्यात आलेली कार चोरीची असून या गुन्ह्य़ात रवींद्र आणि सुमीत या दोघांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. घोडबंदर भागातील सापळ्यादरम्यान रणजीतकडून जप्त करण्यात आलेल्या कारमध्ये लॅपटॉप, कॅमेरा आणि पेनड्राइव्ह असे साहित्य सापडले होते. या साहित्याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली, मात्र त्यांनी त्याविषयी काहीच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे लॅपटॉप कंपनीशी संपर्क साधून त्याच्या मालकाला शोधून काढले. पुण्यातील देहू रोड परिसरात लॅपटॉपचा मालक राहत होता. तिथे जाऊन पोलिसांनी त्याच्याकडे लॅपटॉपबाबत विचारणा केली. त्यावेळेस त्याने त्याची कार चोरी झाली असून त्यामध्ये हा लॅपटॉप असल्याचे सांगितले. तसेच पेनड्राइव्हमध्ये एका व्यक्तीचे परिचयपत्र सापडले होते. त्यातील मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलीस मालकापर्यंत पोहचले. त्या व्यक्तीचीही कार चोरली गेली होती. त्यामुळे चोरी झालेल्या या दोन्ही कारबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र, त्या कार राजस्थानमध्ये विकल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या कार अजूनही पोलिसांना सापडलेल्या नाहीत. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. तसेच या चौघांकडून एकूण नऊ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यापैकी तीन वाहने पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहेत.

वाहनांच्या चावीचे किट तोडून त्या ठिकाणी बसविण्यात येणारे दुसरे किटही पोलिसांना त्यांच्याकडे सापडले. या किटबाबत पोलिसांनी वाहन कंपन्यांकडे चौकशी केली. मात्र, कंपन्यांकडून अशाप्रकारच्या किटची निर्मिती करण्यात येत नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अशा किटची निर्मिती करणारे पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्याचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 12:52 am

Web Title: mumbai car thieves mumbai car theft car robbery in andheri mumbai crime
Next Stories
1 बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारित विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
2 सफाळे येथे मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प
3 मुंबईत अटक केलेल्या ‘त्या’ महिला दाऊद टोळीच्या ‘खबरी’ निघाल्या!
Just Now!
X