मुंबईतील मालाडमध्ये एक महिला गाडीत बसून बाळाला स्तनपान करत असताना तिची गाडी टो करुन नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाडी टो करताना संबंधित महिलेकडे बाळ नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे.

नो पार्किंगमधील एक गाडी वाहतूक पोलिसांकडून टो केली जात असल्याचा एक व्हिडिओ शनिवारी समोर आला होता. ही घटना मालाड पश्चिम येथे घडली होती. यावेळी गाडीत एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करत होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी असंवेदनशीलता दाखवल्याची टीका मोठ्या प्रमाणात झाली होती.

आता याच घटनेचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाडी टो होत असताना गाडीत बसलेल्या महिलेकडे बाळच नव्हते, असे दिसत आहे. गाडी टो केली जात असताना महिलेचे बाळ तिच्या कुटुंबीयांकडे होते. मात्र पोलिसांनी गाडी टो केल्यावर महिलेने कुटुंबीयांकडून बाळाला गाडीत घेतले. हा नवा व्हिडिओ आणि त्यातील घटना, कालच्या व्हिडिओतील घटनेच्या विरुद्ध आहेत. ‘बाळाला स्तनपान करताना पोलिसांनी गाडी टो केली. त्यांनी मला गाडीतून बाहेर पडा, असे सांगण्याचीही तसदी घेतली नाही,’ असे ज्योती माले यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले होते.

राष्ट्रीय महिला आयोगाने या सर्व प्रकरणावर भाष्य करताना दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र या घटनेत महिलेचे वर्तनही बेजबाबदार असल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल करावा, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांनी म्हटले होते. ‘गाडी टो होत असताना महिला गाडीत बसून राहिली. त्यामुळे तिने बाळाचा जीव धोक्यात घातला,’ असे शर्मा यांनी एएनआयसोबत बोलताना म्हटले.