News Flash

मुंबई सेंट्रल आगार पुन्हा गजबजणार!

प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

संग्रहित छायाचित्र

दिवाळी विशेषच्या निमित्ताने लांबच्या फेऱ्या पुन्हा सुरू; प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाच्या नावाखाली रद्द झालेल्या मुंबई सेंट्रल आगारातील लांब पल्ल्याच्या गाडय़ा दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र या गाडय़ा नैमित्तिक गाडय़ा नसून त्या दिवाळी विशेष गाडय़ा म्हणूनच चालवण्यात येणार आहेत.

एकाच शहरात असलेल्या दोन आगारांमधून राज्यातील एकाच ठिकाणी गाडय़ा जात असतील, तर एका आगारातील सेवा बंद करण्याचे धोरण  महामंडळाने स्वीकारले होते. मात्र आता दिवाळी विशेष गाडय़ांच्या निमित्ताने बंद केलेल्या गाडय़ांपैकीच काही गाडय़ा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

या निर्णयानुसार आता मुंबई सेंट्रल आगारातून दिवसभरात १६ जादा फेऱ्या राज्यातील विविध ठिकाणी चालवण्यात येणार आहेत. यात मुंबई-सातारा (२), मुंबई-कराड (२), मुंबई-दापोली, मुंबई-तारकपूर, मुंबई-त्र्यंबक, मुंबई-फलटण, मुंबई-धुळे, मुंबई-मुक्ताईनगर, मुंबई-बार्शी, मुंबई-कोळथरे, मुंबई-अलिबाग (२) आणि मुंबई-स्वारगेट (२) या फेऱ्यांचा समावेश आहे. या फेऱ्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या असून त्या १४ नोव्हेंबपर्यंत चालवण्यात येतील.

२२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यांदरम्यान दर दिवशी  सर्व विभागांमध्ये मिळून ५०० जादा गाडय़ा चालवण्याचे नियोजन एसटीने केले आहे.

१३०० गाडय़ांचे आरक्षण पूर्ण

विशेष गाडय़ा २२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यानच धावणार आहेत. मुंबई सेंट्रल आगाराबरोबरच एसटीच्या मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये एसटीने दिवाळी विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत १३०० गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:33 am

Web Title: mumbai central bus depot
Next Stories
1 परवडणारे घर ६० लाखांचे!
2 पालघरमधील कुपोषण रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सरसावला!
3 पुनर्विकासाचे इमले हवेतच!
Just Now!
X