मुंबईतील वर्दळीचे आणि महत्त्वाचे समजले जाणारे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक लवकरच वाय-फायच्या कक्षेत येणार आहे. माहिती महाजालातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने देशात ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. त्याचा शुभारंभ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा सुरू करून या उपक्रमाची सुरूवात केली जाणार असल्याचे समजते. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासूनच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गुगलची मोफत वाय-फाय सुविधा वापरता येईल असा अंदाज असल्याचे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे. दिवसभरात अर्ध्या तासासाठी प्रवाशांना ही वाय-फाय सुविधा मोफत वापरता येईल. त्यामध्ये प्रवाशांना कोणतेही एचडी व्हिडिओ विनासायास पाहता येतील आणि चित्रपट केवळ चार मिनिटांत डाऊनलोड होईल इतका स्पीड प्रवाशांना मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
भारतातील ४०० रेल्वेस्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्याचा हा उपक्रम गुगलच्या वाटचालीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. या सुविधेचा भारतातील जवळपास एक कोटी रेल्वे प्रवासी दररोज उपभोग घेऊ शकणार आहेत. या उपक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी ‘डिजीटल इंडिया’ मोहिमेला हातभार लागणार आहे.