मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी विठ्ठलवाडी – कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) येणाऱ्या लोकल ट्रेन विलंबाने धावत असून यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी उशिराने धावत असलेल्या लोकलगाड्या आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप काही केल्या थांबताना दिसत नाही. गुरुवारी सकाळी विठ्ठलवाडी – कल्याणदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन सुमारे २० मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे ऑफीसला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे वृत्त असले तरी रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ जाईल असे समजते.

मंगळवारीदेखील मध्य रेल्वेवर परळ स्थानकात एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मध्य रेल्वेचा बोजवारा उडाला. या बिघाडामुळे ५० लोकल गाड्या उशिराने धावल्या. तर ८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.