संकटसमयी एकमेकां साकरण्याच्या मुंबईकरांच्या संस्कृतीचे दर्शन

‘आता पुन्हा कधी मुंबईत पाय ठेवायचा नाही. भारतात इतकी वाईट अवस्था असते याची कल्पनाही नव्हती. आजचा दिवस म्हणजे आमच्या जीवनातील सर्वात वाईट दिवस आहे..,’ असे म्हणत मुंबईसह भारतातील प्रशासकीय यंत्रणेच्या नावाने खडे फोडणाऱ्या फ्रेंच पर्यटकांनी बुधवारी सकाळी मात्र, ‘आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आणि खूप सुखद अनुभव देणारा होता. हा दिवस आम्हाला माणुसकी शिकवणारा होता,’ अशा शब्दांत मुंबईकरांच्या माणुसकीला सलाम केला. दहशतवादी हल्ला असो की प्रलयंकारी पाऊस.. मुंबईकर एकदिलाने दुसऱ्याची मदत करायला धावतो, हा आजवरचा अनुभव मंगळवारच्या पावसातही आला. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे रस्ते दुथडी भरून वाहात असताना माणुसकीचा प्रवाहही तितक्याच वेगाने धावत होता..

मंगळवारी शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई बुडीतखात्यात गेली असली तरी तमाम मुंबईकर एकत्र येऊन त्यांनी पावसामुळे लोकल गाडय़ांमध्ये किंवा रस्त्यांमध्ये विविध वाहनांवर अडकलेल्यांना चहा, पाणी, नाश्ता जेवण इतकेच नव्हे तर राहण्याची सोयही केली. येणारा आश्रित कोणत्या जाती-धर्माचा आहे, याची विचारणा न करता येईल त्याची अगत्याने सोय करण्याच्या एकमेव विचारांनी असंख्य हात मंगळवारी राबताना दिसत होते. दादर येथील चित्रा सिनेमागृहासमोर असलेल्या गुरुद्वारामार्फत जेवणाची तसेच राहण्याची सोय करण्यात आली होती. या गुरुद्वारामार्फत सुमारे दहा हजार लोकांना जेवण देण्यात आले, तर ७५० लोकांची रात्री राहण्याची सोय करण्यात आली होती. याच गुरुद्वारामध्ये अ‍ॅन, सोफी आणि त्यांचे मित्र हे फ्रेंच पर्यटक रात्रनिवाऱ्यासाठी आले होते. मुंबई फिरण्यासाठी आलेले हे पर्यटक पावसात अडकले आणि त्यांना कोठेही हॉटेल मिळेनासे झाले. अखेर गुरुद्वाराच्या एका स्वयंसेवकामार्फत ते दादर येथे पोहोचले. तेथे एका चांगल्या खोलीमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्यांना जेवणही देण्यात आले. या निरपेक्ष पाहुणाचाराने हे फ्रेंच पर्यटक इतके भारावून गेले की, काही तासांपूर्वी आपण मुंबईच्या नावाने उगाच खडे फोडले, याबाबत त्यांच्या बोलण्यातून पश्चात्ताप व्यक्त होत होता.

खार, वांद्रे, सांताक्रूझ या परिसरात खाद्यपदार्थ पुरविणारे रुपिन भिजीयानी यांनी सुमारे २५० हून अधिक लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. तर कुर्ला, घाटकोपर आणि विद्याविहार या परिसरात अडकलेल्या लोकांना जेवण व राहण्याची सोय करण्यासाठी हर्षद पारेख यांनी त्यांचे इंटरलिंक हे शुभकार्याचे सभागृह खुले केले होते. तेथे पारेख यांनी त्यांचे मित्र जितेन गजारिया यांच्या मदतीने सुमारे ७०० लोकांना जेवणाचे वाटप केले. तर २५० लोकांची राहण्याची सोय केली. त्यांनी नागरिकांना कोरडे कपडेही उपलब्ध करून दिले. त्यांच्या सभागृहात एका महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी बाजूच्या इमारतीमधील डॉक्टरांना बोलवून तिच्यावर तातडीने उपचारही केले.

मुंबईवर आलेल्या आपत्तीला झुंज देण्यासाठी संपूर्ण नौदल सज्ज होतेच. याशिवाय त्यांनी चार ठिकाणी निवारेही उभारले होते. इतकेच नव्हे तर विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना जेवणही पुरविले. त्यांनी उभारलेल्या निवारामध्ये ५० हून अधिक नागरिकांनी निवारा घेतला. याचबरोबर नौदलाच्या वैद्यकीय पथकाने अनेक नागरिकांवर उपाचारही केले. प्रभादेवी येथील सिद्धविनायक मंदिर न्यासानेही पोलीस, बेस्ट कर्मचारी यांच्यासह सुमारे १२०० लोकांना खाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या रात्रनिवाऱ्यात सुमारे ६०० नागरिकांची निवासीची सोय करण्यात आली होती.

मंडळांचा मदतीचा हात

जागोजागी अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेश मंडळेही खंबीरपणे उभी राहिली. वडाळाच्या राम मंदिर येथील जीएसबी गणेशोत्सव समितीतर्फे दरवर्षी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या प्रसाद ग्रहणासाठी अन्नछत्र उभारले जाते. मंगळवारी संध्याकाळी अडकलेल्यांची संख्या लक्षात घेता समितीकडून हे अन्नछत्र सर्वासाठी खुले करण्यात आले.  सुमारे १२ हजार नागरिकांनी अन्नछत्रात भोजन केल्याचा दावा उत्सव समितीचे अध्यक्ष उल्हास कामत यांनी केला. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाकडूनही पुलावभात उपलब्ध करून देण्यात आला होता. अंदाजे २२ हजार लोकांनी अन्नग्रहण केल्याचे आणि ३५० लोक मंडळाच्या सभागृहात राहून गेल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. याशिवाय गणेशगल्ली मंडळानेदेखील दर्शनानिमित्ताने कल्याण,डोंबिवली आणि विरार येथून आलेल्या ७८ नागरिकांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय केली. याशिवाय करी रोड येथील पंचगंगा सार्वजनिक मंडळातील रहिवाशांनीदेखील अडकलेल्या लोकांना मदत पुरवली. प्रत्येक  घरातून जमविण्यात आलेल्या ४० किलो भाताची खिचडी करण्यात आली. ही खिचडी रेल्वेच्या अपंग डब्यातील प्रवाशांमध्ये वाटण्यात आली.