शिवडी, शीव-कोळीवाडा, भायखळय़ात सर्वाधिक संख्या

मुंबई शहरांतील दहा विधानसभा मतदारसंघांत १८ ते १९ वयोगटातील ३२ हजार ४५६ नवमतदार आहेत. यात शिवडी, शीव-कोळीवाडा, भायखळात सर्वाधिक मतदार असल्याची नोंद आहे. नव्वदीच्या पुढीलही मतदारांची संख्या मोठी आहे. जवळपास २३ हजार पेक्षा जास्त या मतदारांची संख्या आहे.

१८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे अभियान राबविले जाते. यात महाविद्यालयांमध्येही जाऊन जनजागृती करण्यात येते. त्यामुळेच नवमतदारांची संख्या ही वाढतच आहेत. मुंबई शहरात धारावी, शीव-कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा मतदारसंघ येतात. या दहा विधानसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ९ हजार ४५३ मतदार आहेत. यात तृतीयपंथीय मतदारांची संख्या १३२ एवढी आहे.  तर पुरुष मतदार १३ लाख ७१ हजार १४० आणि महिला मतदार ११ लाख ३८ हजार १८१ आहेत.

मुंबई शहर जिल्हा निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दहा विधानसभा मतदारसंघांत १८ ते १९ वयोगटातील ३२ हजार ४५६ मतदारांची नोंद झाली आहे. शिवडीत सर्वाधिक ३ हजार ६४६ असून शीव-कोळीवाडय़ात ३ हजार ५५४ व भायखळ्यात ३ हजार ३९७ एवढे नवमतदार असल्याचे सांगण्यात आले. नव्वदीच्या पुढीलही मतदारांची संख्या मोठी आहे. ९० ते ९९ मधील २० हजार ७९७ मतदार आहेत. ९९ पुढीलही ३ हजार ५४ मतदार असून मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबात या मतदारांची आघाडी आहेत.