मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या सतत कमी होत असली तरी मृतांच्या संख्येत मात्र चढउतार आहे. सोमवारी ७२८ नवीन रुग्णांची नोंद झाली तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात ९८० रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ५५० दिवसांपर्यंत वाढला आहे.

एकूण बाधितांची संख्या ७ लाख १२ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ९८० रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७९ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १५ हजार ७८६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

राज्यात मोठी रुग्णघट

राज्याचा करोना रुग्णआलेख झपाटय़ाने घसरत आहे. राज्यात सोमवारी १० हजार २१९ नवे रुग्ण आढळले, तर १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २१ हजार ८१ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यात सध्या एक लाख ७४ हजार ३२० उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ४७६ रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात सोमवारी ४७६ करोना रुग्ण आढळून आले. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ४७६ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १३४, मीरा-भाईंदर ८९, ठाणे ८२, नवी मुंबई ६६, ठाणे ग्रामीण ६०, अंबरनाथ १५, बदलापूर १३, उल्हासनगर १२ आणि भिवंडीत पाच रुग्ण आढळून आले. तर ३५ मृतांपैकी कल्याण-डोंबिवली २१, ठाणे चार, ठाणे ग्रामीण चार, मिरा-भाईंदर तीन, नवी मुंबई दोन आणि उल्हासनगरमधील एकाचा समावेश आहे.