मुंबईकरांना केवळ हूल देऊन गायब झालेली थंडी किमान तीन दिवस तरी परतण्याची शक्यता नाही. उत्तरेतही थंडीची लाट ओसरली असून पुढील आठवडय़ात तेथे थंडी परतण्याची शक्यता आहे. तेव्हा वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून असल्यास मुंबई पुन्हा थंडगार होऊ शकेल.
जानेवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात थंडीने जोरदार आघाडी उघडली होती. किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले होते. मात्र त्यानंतर थंडीचा प्रभाव ओसरू लागला. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात तर पावसाच्या शिडकाव्यानंतर थंडी पार पळाली. गेल्या चार दिवसात मध्यान्हाला घराबाहेर पडणारे मुंबईकर घामाघूमही होऊ लागले आहेत. सांताक्रूझ आणि कुलाबा येथील हवामान केंद्राच्या तापमापकातील पाराही हेच दाखवत आहे. कमाल तापमान तब्बल ३५ अंश सेल्सिअस होत असून रात्रीही पारा खाली उतरताना दिसत नाही. उत्तर भारतातही थंडी ओसरली असून हे हवामान आणखी तीन दिवस तरी कायम राहणार आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितल़े