हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा

मुंबई : करोना संचारबंदीमुळे रस्त्यांवरील वाहने व गर्दीचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर उंचावला आहे. सर्वसाधारणपणे वाईट स्तरावर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी उत्तम स्तरावर राहिला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे आवाहन आणि सोमवारपासून लागू केलेली संचारबंदी यामुळे मुंबईतील रस्ते ओस पडू लागले. वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण घटत गेले. एरवी मुंबईच्या हवेतील पीएम २.५ चे प्रमाण २०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक म्हणजे वाईट ते अतिवाईट स्तरावर असते. पण मंगळवारी हे प्रमाण १०० च्या आसपास म्हणजे उत्तम स्तरावर राहिले. तर नवी मुंबईच्या हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण १७८म्हणजे मध्यम स्तरावर राहिले.

भांडुप, कुलाबा, वरळी, वांद्रे -कुर्ला संकुल आणि चेंबूर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम व समाधानकारक स्तरावर राहिला, तर मालाड, माझगाव वांद्रे-कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी येथे निर्देशांक मध्यम स्तरावर होता. वांद्रे-कुर्ला संकुलात गेल्या दोन महिन्यात सातत्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक अति वाईट स्तरावर होता, त्यामध्ये संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मोठी सुधारणा झाली.