सिंचन घोटाळ्यातील कंपनीला कोटय़वधींचे कर्ज; विखे -पाटील यांच्या कारखान्यावरही मेहेरनजर

गोसीखुर्द प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीला मुंबै बँकेतील सत्ताधाऱ्यांनी राजकीय दबावापुढे झुकून व प्रशासन आणि काही संचालकांचा विरोध डावलून तब्बल ६८ कोटींचे कर्ज बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासही ३५ कोटींचे कर्ज नियमबाहय़पणे देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून ही नियमबाह्य़ कर्ज प्रकरणे पुन्हा संचालक मंडळाच्या बैठकीत न मांडल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिल्याने युती सरकारमधील संघर्ष आता मुंबै बँकेतही तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बँकेने कॉर्पोरेट कर्ज धोरणानुसार गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांशी संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांना मनमानीपणे व नियमबाह्य़रीतीने कर्जे वाटताना केवळ राजकीय लागेबांधे एवढाच निकष वापरला, असा आरोप होत आहे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीस ६८ कोटी रुपयांचे कर्ज राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या इशाऱ्यावरूनच मंजूर केल्याची चर्चा असून मुनगंटीवार यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या गोसीखुर्द प्रकल्पातील एका कामातील गैरव्यवहारावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीस मे.व्ही. प्रभाकर रेड्डी यांच्या संयुक्त भागीदारीत मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर दिंडोरा बॅरेजचे ३१६ कोटींचे काम २०१२ मध्ये देण्यात आले. या कामाची मुदत आता मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या कामासाठी कंपनीने मुंबै बँकेकडे ६८ कोटी रुपये ‘कॅश क्रेडिट’ची मागणी केली होती. मात्र हे काम संयुक्त भागीदारीत असून कंपनीने बँक हमीपोटी दिलेल्या मालमत्ता या कंपनीशी संबंधित नसलेल्या त्रयस्थांच्या असल्याने, तसेच कंपनीच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने आणि प्रकल्पासाठी २५ टक्के स्वनिधी उपलब्ध केलेला नसल्याने हे क र्ज मंजूर करणे धोक्याचे आहे, असा स्पष्ट अभिप्राय बँकेच्या सल्लागारांनी दिला. त्यामुळे कर्ज देऊ नये, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. मात्र राजकीय दबावानंतर प्रशासन आणि काही संचालकांचा विरोध झुगारून सात अटी घालून या कर्जास मान्यता देण्यात आली.

धक्कादायक म्हणजे या अटींची पूर्तता होण्यापूर्वीच पाच कोटींची उचलही संबंधितांना देण्यात आल्याचा आरोप अभिषेक घोसाळकर, नंदकुमार काटकर आदी सहा संचालकांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील संचालक असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासही राजकीय दबावातून ३५ कोटींचे कर्ज बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारखान्याचे नक्त मूल्य उणे (नेटवर्थ) असून संचित तोटा १३२ कोटी आहे. त्यामुळे नेटवर्थ उणे असलेल्या या कारखान्यास कर्ज देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. मात्र, सहकारात विरोधी पक्षांनाही सांभाळावे लागते, असे सांगत बँकेच्या अध्यक्षांनी कर्जमंजुरीचा आग्रह धरल्याने काही अटी घालून आणि संचालकांचा विरोध झुगारून हे कर्ज संमत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेने मात्र या कर्जास आक्षेप घेतला असून राजकीय दबावाने मंजूर करण्यात आलेले हे कर्ज  पुन्हा संचालक मंडळाच्या बैठकीत मांडावे, अशी मागणी एका पत्रान्वये अध्यक्षांकडे केली आहे. ज्या भाजपने सिंचन घोटाळ्याचे आरोप करीत सत्ता मिळविली तीच मंडळी आता या घोटाळय़ातील ठेकेदारांना मदत करीत आहेत, हा कसला पारदर्शी कारभार, असा सवाल अभिषेक घोसाळकर यांनी केला आहे. त्यामुळे या बँकेतही आता शिवसेना आणि भाजपतील वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सेनेचे आरोप कपोलकल्पित- मुनगंटीवार

श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि मुंबै बँकेशी आपला कोणताही संबंध नसून आपण कोणावही कसलाही दबाव आणलेला नाही. आपल्यामुळे कर्ज दिल्याचा आरोप कपोलकल्पित असून माझ्या खात्याचा या बँकेशी कसलाही संबंध येत नाही, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. चुकीच्या पद्धतीने कर्ज देणाऱ्यांवर आरबीआय योग्य ती कारवाई करेल. केवळ राजकारणापोटी आपल्यावर खोटेनाटे आरोप केले जात असून त्याला काहीही अर्थ नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

राजकीय आकसापोटी आरोप- विखे पाटील

मुंबई बँकेने आपल्या कारखान्यास नियमानुसार आणि सर्व अटींची पूर्तता झाल्यावरच कर्ज दिले आहे. केवळ आपण शिवसेनेवर टीका करतो म्हणून राजकीय आकसापोटी आपल्यावर आरोप केले जात आहेत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या ६८ वर्षांत आमचा कारखाना कधीही एनपीएमध्ये नसून कर्जफेडीबाबत आवश्यक सर्व हमी तसेच व्यक्तिगत हमीही आम्ही दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे पाटील म्हणाले.