20 February 2019

News Flash

किनारपट्टीचा ऱ्हास!

मुंबईला अंदाजे ११४ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

विकासकामांमुळे मुंबईतील किनाऱ्यांची वाढती धूप

मुंबईच्या सागरी किनारपट्टीवर वाढलेल्या विकासकामांमुळे गेल्या पाच वर्षांत शहरातील सर्व किनाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात धूप झाल्याची माहिती यंदाच्या ‘महाराष्ट्र तटरेखा व्यवस्थापन’ अहवालातून उघड झाली आहे. दादर किनारपट्टीचा ऱ्हास सर्वाधिक झपाटय़ाने होत असून गिरगाव, वसरेवा, जुहू, अक्सा आणि गोराई येथील किनाऱ्यांची धूप वाढत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे संशोधन करणाऱ्या सिंगापूर येथील खासगी संस्थेने धूप रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर उपाययोजना करण्याची सूचना दिली असली तरी येत्या काळात मुंबईजवळ समुद्रात उभे राहणारे छत्रपती शिवाजी स्मारक, कोस्टल रोड अशा प्रकल्पांमुळे किनारे अधिक आक्रसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईला अंदाजे ११४ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. वालुकामय, खडकाळ आणि खारफुटींनी वेढलेल्या या किनारपट्टीची धूप होण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षांत अधिक वेगवान झाली आहे. हीच बाब महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ‘तटरेखा व्यवस्थापन अहवाल २०१७’मधून स्पष्ट होत आहे. ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने अहवाल जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. किनारपट्टींचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’ने सिंगापूर येथील ‘सेंच्युरी बीच प्रा.लि.’ या संशोधन संस्थेला कंत्राट दिले होते.

या संस्थेने सादर केलेल्या अहवालात मुंबईच्या विविध किनाऱ्यांना योग्य व्यवस्थापनाच्या आवश्यकता असल्याची नोंद करण्यात आली आहे. किनाऱ्यांची धूप होण्याची पातळी, त्याची प्रक्रिया आणि ती रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांच्या बाबींची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

दादर येथील किनारपट्टीची धूप होण्याची प्रक्रिया संथ करण्यासाठी येथील समुद्राला मिळणाऱ्या मिठी नदीचे प्रदूषण कमी करून तिच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रभादेवीकडील किनाऱ्याचे रूपांतर खडकाळ किनाऱ्यात झाल्याची माहिती येथील रहिवाशी आणि दादर किनारा स्वच्छता मोहिमेचे प्रणेते जय शृंगापुरे यांनी दिली.

शिवाय मिठी नदीच्या माध्यमातून वाहत येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले असून हा कचरा दादरच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात साचत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियदर्शिनी पार्क किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी किनाऱ्यालगत ‘ट्रायपॉड’ टाकण्याची सूचना देण्यात आली आहे. जुहू, अक्सा, गोराई किनाऱ्यांवर पर्यटकांकरिता सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.  मुंबईतील किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात होणारे बांधकाम हे सागरी रेषा पुढे ढकलण्याचे काम करत आहे. यामुळे नैसर्गिक स्वरूपात होणाऱ्या वाळूच्या प्रवाह प्रक्रियेला अटकाव होत असून पुन्हा किनाऱ्यांवर वाळू साचण्याचे प्रमाण कमी होत आहे.

अहवालात काय?

  • दादर येथील किनारपट्टीची सर्वाधिक झपाटय़ाने धूप होत असून ही प्रक्रिया सुरू राहील.
  • वांद्रे-वरळी सागरी सेतू निर्माण झाल्यापासून प्रभादेवी ते माहीम पट्टय़ातील किनाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे.
  • दक्षिण मुंबईतील प्रियदर्शिनी पार्क किनाऱ्याची धूप सर्वसामान्य पातळीवर आहे.
  • जुहू, अक्सा, गोराई किनाऱ्यांची धूप मध्यम पातळीवर.

या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीच्या मंजुरीची मागणी करण्यात आली असून या निधीच्या आधारे अहवालात दिल्या गेलेल्या सूचना प्रत्यक्षात अमलात आणण्यात येतील.

जितेंद्र रायसिंघानी, उपसंचालक, महाराष्ट्र सागरी मंडळ

First Published on February 15, 2018 2:32 am

Web Title: mumbai coastal area losses due to developmental works