मुंबईत शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राजेश कुसळे आणि किशोरी पेडणेकर समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त असून यात दोन शिवसैनिक जखमी झाले आहेत. जखमी शिवसैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राजेश कुसळे यांना शाखाप्रमुख पदावरुन हटवण्यात आले होते. यावरुन त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली होती. मंगळवारी शिवसेनेच्या फलकांवरील राजेश कुसळे यांच्या नावावर काळी पट्टी लावण्यात आली. यावरुन कुसळे यांचे समर्थक संतापले. या कारणावरुन किशोरी पेडणेकर आणि राजीव कुसळे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शेवटी विभागप्रमुख आणि उपविभाग प्रमुखांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केले.

वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांवरुन शिवसेनेत नाराजी आहे. राजेश कुसळे हे गेली १९ वर्ष शाखा क्रमांक १९९ चे शाखा प्रमुख आहेत. त्यांच्याऐवजी गोपाळ खाडे यांची शाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे कुसळे समर्थक नाराज होते. खाडे यांना शाखेत प्रवेश देणार नाही, असा पवित्राच कुसळे समर्थकांनी घेतल्याचे समजते. महापालिका निवडणुकीत कुसळे यांना डावलून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आले होते. यामुळे कुसळे नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने कुसळे यांना बेस्ट समितीवर सदस्य म्हणून पाठवले.